सोलापूर : मोफत जयपूर फूट शिबिरात शनिवारी १६० दिव्यांगांच्या पायाचे माप घेण्यात आले. सुनील शहा यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त संकेत शहा, ऍड. सुरेल शहा आणि माऊली फाउंडेशन (काळबादेवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मारक येथे हे शिबिर घेण्यात आले. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून शहा बंधूंनी सामाजिक ऋण फेडण्याच्या हेतूने हा कौतुकास्पद उपक्रम राबविला. आगामी महिनाभरात या दिव्यांगांना मोफत जयपूर फूट, कॅलिपर देण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऍड. अनिल सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती संदेश पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत, सुनील शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संकेत शहा, ऍड. सुरेल शहा, बाळासाहेब गायकवाड, ऍड. विश्वनाथ टाळकुटे, ओनिल गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिव्यांगांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना दैनंदिन जीवनात कामे करताना कृत्रिम पाय व कॅलिपरची आवश्यकता प्रकर्षाने भासते. कृत्रिम पाय, कॅलिपर नसल्यामुळे नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातून अनेक दिव्यांग बांधवांमध्ये न्यूनगंडाची भावना तयार होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. परिणामी, त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. यावर उपाय म्हणून शहा परिवाराने सुनील शहा यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपर विनामूल्य देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी महिनाभरात या दिव्यांगांना मोफत जयपूर फूट, कॅलिपर देण्यात येणार आहे.
——-
दिव्यांग बांधवांनी मानले आभार
अत्यंत खर्चिक असल्यामुळे जयपूर फूट, कॅलिपर पासून आम्ही आजवर वंचित राहत होतो. शहा परिवार, माऊली फाउंडेशन यांनी मोफत जयपूर फूट शिबीर आयोजित करून दिव्यांगांना मोठा आधार दिला आहे असे सांगत दिव्यांग बांधवांनी संकेत शहा, ऍड. सुरेल शहा आणि शहा परिवाराचे आभार मानले.
———
सामाजिक कार्याचे आत्मिक समाधान
वडिलांच्या वाढदिवसानिमित्त समाजाला उपयोगी असणारा उपक्रम राबवावा असा मानस होता. त्यातूनच मोफत जयपूर फूट शिबिराची संकल्पना पुढे आली. लवकरच या सर्व १६० दिव्यांग बांधवांना मोफत जयपूर फूट, कॅलिपर देण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांना स्वावलंबी करण्यासाठी काम करता येत असल्याचे आत्मिक समाधान आहे.
— ऍड. सुरेल शहा



















