मंगळवेढा – ‘सुविधा हव्या, पण कर नको’ म्हणणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध मंगळवेढा नगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तब्बल २.२४ कोटींच्या थकबाकीसाठी पालिकेने राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले असून, पहिल्या तीन दिवसांतच २९ लाख ४३ हजार ९९६ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांत प्रशासकराज आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर वसुलीचे काम अक्षरशः रखडले होते. परिणामी थकवाकीचा आकडा कोट्यवधींवर जाऊन पोहोचला.
मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर प्रशासनाने ‘आता कोणतीही सवलत नाही’ अशी भूमिका घेत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टी थकवणाऱ्यांवर पालिकेने थेट नळतोडणीची मोहीम सुरू केली आहे.
थकबाकीदारांच्या घरांवर धडक देत पथकांनी पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, अनेकांनी तातडीने थकचाकी भरण्यास सुरुवात केली आहे.
घरपट्टीची थकबाकी १ कोटी २३ लाख ६५ हजार ६१६ रुपये, तर पाणीपट्टीची थकबाकी १ कोटी १ लाख ४ हजार ४३८ रुपये इतकी प्रचंड आहे.
या थकबाकीमुळे पालिकेच्या विकासकामांवर मोठा परिणाम होत असून, अनेक प्रकल्प निधीअभावी रखडण्याची वेळ आली आहे.
उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही मंगळवेढा शहरवासीयांना त्या झळा बसू नयेत, म्हणून पालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.
मात्र सुविधा मिळूनही कर भरण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने प्रशासनात नाराजी व्यक्त होत आहे. करनिरीक्षक महानंदा धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली गोरख काकडे, सागर गडेकर, युनूस मोगल, हरीप्रसाद देवकर, अजय माने, अशोक डोके, वसंत वाघमोडे यांच्या पथकांनी शहरात घडक मोहीम राबवली.
काही ठिकाणी थकबाकीदारांकडून कर्मचाऱ्यांशी अरेरावी करण्यात आली. तरीही कर्मचाऱ्यांनी संयम राखत आपली कारवाई सुरू ठेवली. नगरपालिकेकडून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी निधी आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला कर वेळेत भरणे ही जबाबदारी आहे, असे आवाहन करनिरीक्षक महानंदा धुमाळ यांनी केले आहे.
पालिकेच्या या आक्रमक मोहिमेमुळे शहरात आता ‘कर भरा नाहीतर कारवाईला सामोरे जा’ असा स्पष्ट संदेश गेला असून, पुढील काही दिवसांत वसुलीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घरपट्टीची थकबाकी १ कोटी २३ लाख ६५ हजार ६१६ रुपये, तर पाणीपट्टीची थकबाकी १ कोटी १ लाख ४ हजार ४३८ रुपये इतकी प्रचंड आहे. नगरपालिकेने आता स्पष्ट भूमिका घेतली आहे. कर भरा, अन्यथा सुविधा बंद। थकबाकीदारांवर नळतोडणी, दंडात्मक कारवाई यांसारख्या उपाययोजना आणखी तीव्र केल्या जाणार आहेत.



















