सोलापूर -शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या वालचंद शिक्षण समूहाच्या नूतन परिसरात सध्या श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा मंगलमय उत्सव रंगत असून, “शिक्षण हाच धर्म” या उदात्त ध्येयवाक्याला साजेसा आध्यात्मिक सोहळा अनुभवण्याची दुर्मीळ संधी नागरिकांना लाभत आहे. प.पू. निर्यापक श्रमण मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात ६ एप्रिलपासून सुरू झालेल्या या भव्य कार्यक्रममालेत धार्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक उन्नतीचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळत असून, साधना, संयम आणि आत्मशुद्धीची आराधना घडत आहे.
या सोहळ्याची सुरुवात सोमवार, ६ एप्रिल रोजी भक्तिभावपूर्ण वातावरणात झाली. श्री आदिनाथ जैन मंदिर येथून संत शिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य निर्यापक श्रमण मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्यासह मुनीश्री विशालसागरजी, धवलसागरजी, मंथनसागरजी, मननसागरजी, विरलसागरजी महाराज तसेच क्षुल्लक श्री १०५ विजितसागरजी महाराज असा मुनिसंघाचा विहार मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून होत सायंकाळी वालचंद शिक्षण समूहाच्या डब्ल्यू.आय.टी. जैन मंदिर येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी श्रावक-श्राविका, विद्यार्थी तसेच जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावपूर्ण अगवाणी केली. बँड पथकाच्या संगीतमय वातावरणात “जिओ और जिने दो ” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. या प्रसंगी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, पृथ्वीराज गांधी, वैभव गांधी, पराग शहा, ब्रिजेश गांधी यांच्यासह संपूर्ण गांधी परिवार उपस्थित होता. तसेच वालचंद शिक्षण समूहातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला.
———-
१२ एप्रिलपर्यंत अध्यात्माचा महोत्सव
७ व ८ एप्रिल : घटयात्रा, अभिषेक, शांतीधारा, ‘भक्तामर स्तोत्र’ व ‘श्री महावीर विधान’.
९ एप्रिल : रोजी ‘विश्व नवकार मंत्र दिवस’ निमित्त सकल जैन समाजाच्या वतीने सामूहिक णमोकार मंत्र जप.
१० आणि ११ एप्रिल : विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, नैतिक मूल्ये आणि एकाग्रता वाढविण्यावर आधारित विशेष कार्यशाळा.
१२ एप्रिल : शिक्षण आणि संस्कार यांचा समन्वय कसा साधाण्यासाठी शिक्षक व कर्मचारीसाठी मार्गदर्शनपर सत्र.


















