सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी परिसरात एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका पाचवीतील विद्यार्थ्याचा सीना नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. समर्थ कोळी (वय अंदाजे १०-११ वर्षे) असे या मृत मुलाचे नाव असून, या दुर्घटनेत त्याच्या इतर दोन मित्रांना सुदैवाने वाचवण्यात यश आले आहे.
शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर समर्थ आणि त्याचे तीन मित्र-मैत्रिणी आपल्या शेळ्या घेऊन रानात गेले होते. दुपारच्या कडक उन्हामुळे तहानलेल्या शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी हे सर्वजण न सीना नदीच्या पात्राजवळ पोहोचले. सध्या नदी दुधडी भरून वाहत असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे.
शेळ्यांना पाणी पाजत असताना, उन्हाच्या तडाख्यामुळे या चिमुरड्यांना नदीत पोहण्याचा मोह झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही मित्र नदीच्या पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने तिघेही वाहून जाऊ लागले. यावेळी काठावर असलेल्या त्यांच्या सोबतच्या मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली.
एकाचा अंत, दोघांना जीवदान स्थानिकांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उडी घेतली आणि वाहून जाणाऱ्या दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, समर्थ पाण्याचा वेग जास्त असल्याने खोलवर ओढला गेला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला.
होनमुर्गी गावातील एका उमद्या शाळकरी मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पालकांनी पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांपासून मुलांना लांब ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






















