सोलापूर – राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन २०२५-२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याने यंदा अभूतपूर्व यशाची नोंद करत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे २३ मार्च ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या या प्रदर्शनात सोलापूरच्या केवळ १४ स्वयंसहायता समूहांनी तब्बल ९१.१९ लाख रुपयांची विक्री करत राज्यात आपला ठसा उमटवला.
या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माहिती देताना सांगितले की, ग्रामीण महिलांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सोलापूरच्या महिलांनी आपल्या कष्ट, कौशल्य आणि उत्पादनांच्या गुणवत्तेच्या जोरावर हा उद्देश केवळ साध्यच केला नाही, तर विक्रीचा विक्रम प्रस्थापित करत राज्यात अव्वल स्थान पटकावले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (‘उमेद’) अंतर्गत या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे व राहुल जाधव यांच्या समन्वयातून संपूर्ण व्यवस्थापन पार पडले. नियोजनबद्ध कामकाज, उत्पादनांची निवड आणि सादरीकरणातील आकर्षकता यामुळे सोलापूरचे स्टॉल्स विशेष लक्षवेधी ठरले.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे, निलेश सागर, निखिलकुमार ओसवाल, दीपक वैद्य, इंद्रजीत पवार, चेतनसिंह केदार सावंत, अमृता वाघे, रामप्पा चिवडशेट्टी आणि संस्कृती सातपुते यांनी ‘उमेद’ टीमचे अभिनंदन केले. या यशामुळे सोलापूर जिल्ह्याची ओळख राज्य पातळीवर अधिक भक्कम झाली आहे.
चौकट
‘सोलापुरी स्वाद’ची मुंबईत धूम
प्रदर्शनादरम्यान सोलापूरच्या स्टॉल्सवर ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली. पारंपरिक, घरगुती आणि दर्जेदार उत्पादनांनी मुंबईकरांची मने जिंकली. खाद्यपदार्थमध्ये कडक भाकरी, शेंगा चटणी, काळा मसाला, सांडगे, दही मिरची आरोग्यदायी उत्पादने : सेंद्रिय ज्वारी, कडधान्ये, गूळ, मिलेट पापड फळे व मिष्टान्न : डाळिंब, पेरू, पेडा, सीताफळ रबडी, मटका कुल्फी इतर : बांबू ब्रश, आवळा उत्पादने, नॉन-व्हेज राईस प्लेट व बिर्याणी ग्राहकांनी सोलापुरी उत्पादनांना दिलेला प्रतिसाद इतका मोठा होता की, अनेक स्टॉल्सवर काही वस्तूंचा साठा संपल्याची नोंदही करण्यात आली.
चौकट
विक्रीत आघाडीवर ठरलेले गट
विठ्ठल-रुक्मिणी समूह (पंढरपूर) – ९.२९ लाख
श्री शारदा समूह (पंढरपूर) – ८.६३ लाख
तनीष्का समूह (सोलापूर दक्षिण) – ८.२६ लाख
जिजाऊ समूह (बार्शी) – ७.७७ लाख
उत्कर्ष समूह (अक्कलकोट) – ७.६४ लाख
एकूण १४ गटांनी मिळून ₹९१.१९ लाखांची उलाढाल करत विक्रम नोंदवला.
चौकट
महिला सक्षमीकरणाला नवी दिशा
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच सोलापूर जिल्ह्याने विक्रीत आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. केवळ १४ गटांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री करणे ही राज्यासाठी प्रेरणादायी बाब ठरली आहे. यामुळे ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत हजारो ग्रामीण महिलांना आत्मविश्वास मिळाला असून, त्यांच्यासाठी हा यशाचा नवा टप्पा मानला जात आहे.






















