पंढरपूर – कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला ‘रणभूमी कर्मवीर क्रीडा महोत्सव २०२५-२६ हा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक १ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवात सुमारे १ हजार ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवून स्पर्धेला उल्लेखनीय यश मिळवून दिले.
या क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ तसेच ॲथलेटिक्स अशा एकूण नऊ स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी सादर केली.
स्पर्धेसाठी शिवनेरी, प्रतापगड, अजिंक्यतारा, रायगड, सिंहगड, विजयदुर्ग, तोरणा आणि विशालगड अशी आठ हाऊस तयार करण्यात आली होती. प्रत्येक हाऊससाठी एक पुरुष व एक महिला संघमालक नियुक्त करण्यात आला होता. तसेच प्रत्येक खेळासाठी प्राध्यापक संघ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सुनेत्राताई पवार, अमरजीत पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.जे.जी.जाधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी.जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
महोत्सवासाठी जिमखाना विभागाला विविध मान्यवर व माजी खेळाडूंनी ट्रॉफी स्पॉन्सर करून मोलाचे सहकार्य केले. यामध्ये दीपक पवार, अंशुमन कदम, हॉटेल भारत भुवन, प्रकाश ढाकणे (एमडी डेव्हलपर्स), वैभव भोसले, महावीर गाताडे, ॲड. विजय जाधव, एल. जी. फुड्स, ओंकार लेंडवे, ओंकार बेंगलोरकर, पोलीस अधिकारी वामन यलमार, विकास मोरे तसेच साई स्पोर्ट्स पंढरपूरचे दिनेश गावडे यांचा समावेश होता. तसेच प्रत्येक हाऊससाठी खेळाडूंच्या टी-शर्ट व क्रीडा साहित्याकरिता विविध प्रायोजकांचे सहकार्य लाभले.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलींचा मोठ्या प्रमाणावर झालेला सहभाग होय. मुलींनीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. उमेश साळुंखे, प्रा. अनिल परमार, प्रा. मनोज खपाले व प्रा. विठ्ठल फुले यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे ‘रणभूमी कर्मवीर क्रीडा महोत्सव २०२५-२६ हा अत्यंत यशस्वी ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना व शिस्त या गुणांचा विकास घडविण्यात या महोत्सवाची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली.























