पंढरपूर – आपण आपल्या वैयक्तीक कुठल्याही स्वार्थासाठी तसेच कुठचे तिकीट मिळावे म्हणून सत्ताधारी पक्षासोबत जाणार नाही. कारण २०२९ पर्यंत आता कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे तो पर्यंत तर उमेदवारीचा विषय नाही. दुसरे म्हणजे मागच्या दाराने जाणे आपणाला कदापिही पसंद नाही. जर गेलोच तर आपण जनते मधूनच निवडणूक लढवुन विधानसभेत जाणार आहोत. राहता राहिला विषय म्हणजे सर्वसामान्य जनतेने नगरपालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदी आपला उमेदवार विजयी करुन आपल्यावर पंढरपूर, मंगळवेढा शहराची जी जबाबदारी दिली आहे. ती चोखपणे पार पाडण्यासाठी आपणाला देखील सत्ताधारी पक्षात जाण्या शिवाय पर्याय नाही. कारण आपण देखील सत्तेसोबत असल्याशिवाय शहराच्या,तालुक्याच्या विकास कामांसाठी निधी आणू शकत नाही असे प्रतिपादन विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांनी केले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) पक्षाचे नेते अनिल सावंत यांनी शिवसेना पक्ष प्रवेशा बाबत पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विठ्ठल परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी येथील भालके यांच्या निवासस्थानी मंगळवारी बैठकीचे आयोजन केलेले होते. त्या मध्ये शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) पक्ष प्रवेशाबाबतची आपली भूमिका मांडताना श्री.भालके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदपवार गट) चे अनिल सावंत,साईनाथ अभंगराव, दिलीप धोत्रे आदीं नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.भालके म्हणाले,सत्ताधारी पक्षातील येथील लोकप्रतिनधी तसेच त्यांचे पदाधिकारी मंडळी विकास कामांच्या निधीबाबत सातत्याने दुजाभाव करीत आपली आडवणूक करीत आहेत. पंढरपूरातील मायबाप जनतेने नगराध्यक्षपदाची जबाबदारी देवून आपल्यावर जो विश्वास दाखविलेला आहे तो पुर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. त्यामुळे आता आपणाला मागे हटुन चालणार नाही. शहराच्या विकास कामा संदर्भात मुंबई मध्ये एखाद्या नेत्याला भेटावयाला गेल्यावर विरोधक मंडळी लगेचच संबंधित नेत्यांसोबतचे फोटो काढून या पक्षात प्रवेश, त्या पक्षात प्रवेश अशा प्रकारे आफवा उठवितात.
वास्तविक येथील लोकप्रतिनधींनी जर आपणा बरोबर दुजाभाव केला नाही तर मुंबईत जावुन इतर मंडळींची भेट घेण्याचे कारणच पडत नाही. पण येथील नेते मंडळी आमच्या पक्षात या तरच तुम्हाला निधी देतो म्हणून गळत घालतात. त्यांच्या दावणीला बांधण्यासाठी सातत्याने आडवणूक करतात. अनेक वेळा तर सत्ताधारी मंडळींकडून नोकरशाहीच्या माध्यमातून गळचेपी देखील केली जाते. खोटे गुन्हे दाखल केले जातात. ग्रामीण भागात आपल्या विचाराच्या कार्यकर्त्यांची पिळवणूक,आडवणूक सातत्याने केली जाते. त्यामुळे या गोष्टींचा विचार केला तर आपण देखील सत्तेतील एखाद्या पक्षात सहभागी झाल्या शिवाय आपली आडवणूक थांबणार नाही. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जावू नये यासाठी आपण आपली भूमिका आज मायबाप जनते समोर मांडत आहोत. त्यामुळेच शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू नये यासाठी मुंबई, पुणे येथे नेते मंडळींच्या भेटीगाठी घ्याव्या लागतात अशी ठाम भूमिका भालके यांनी यावेळी मांडली. त्यातूनच आपण सत्तेमध्ये सहभागी असलेल्या एखाद्या पक्षात प्रवेश करावयाच्या निर्णयाप्रत आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
———————
चौकट : ( पक्ष प्रवेशा दिवशी शंभर कोटी निधी आणू )
ज्या दिवशी आपण सत्तेतील सहभागी पक्षात प्रवेश करु त्या सोहळ्यात त्या पक्षाच्या नेत्याकडून पंढरपूरसाठी किमान शंभर कोटी रुपये निधीची घोषणा करुन घेऊ असा विश्वास देखील यावेळी भगिरथ भालके यांनी व्यक्त केला.
—————–
चौकट : ( रेल्वे मैदानावर पक्षप्रवेश सोहळ्याची चर्चा )
येथील रेल्वे मैदानावर १२ एप्रिल रोजी भगिरथ भालके, अनिल सावंत यांचा शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्षात प्रवेश होणार आहे. त्यामुळे हा पक्ष प्रवेशाचा सोहळा मोठा भव्य,दिव्य असणार असून त्याची जय्यत तयारी सुरु असल्याचे भगिरथ भालकेंच्या निकटवर्तींयांकडून सांगितले जात आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















