मोहोळ – देशाच्या राजकारणातील स्थिती एकसंघ ठेवण्यासाठी सतत अडचणी येत राहतील. मात्र देशासमोरील परिस्थिती शांतते सह एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न होतं राहतील रब्बी हंगामात जनावरां साठी चारा टंचाई होईल, वर्षभरात रोगराई, जिवीत हानी होत राहील, पाऊस समाधानकारक पडेल, अशी भाकणूक श्रीक्षेत्र वडवळ येथील श्री नागनाथ देवाच्या यात्रेत गणाच्या दिवशी खर्गेमहाराज पोपटबुवा शिवपुजे यांनी वर्तविली.
श्रीक्षेत्र वडवळ येथील ग्रामदैवत श्री नागनाथ यात्रेचा गण सोहळा गुरुवार दि.९ रोजी मोठ्या भक्तीपुर्ण वातावरणात संपन्न झाला. गणासह खर्गे महाराजांची मिरवणूक, पालखीची मुख्य प्रदक्षिणा पाहण्यासाठी व दर्शणासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.
श्रीक्षेत्र मोहोळ व श्री क्षेत्र वडवळ येथील मानकरी ,संत भाविकांच्या उपस्थितीत पोपटबुवा खर्गेमहाराज यांना विधिवत मंदिरात आणल्यानंतर गण सोहळ्यास प्रारंभ झाला सहा शिवगण व खर्गे महाराज यांना खांद्यावर घेऊन निघालेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती मोहोळ येथून आलेल्या श्री नागनाथांच्या पालखी समवेत संत मंडळीचे टाळाच्या गजरात अखंड भजन, मिरवणूक मार्गांवर सर्वत्र रांगोळी च्या पायघड्या यामुळे सर्वत्र नागेश मय वातावरण निर्माण झाले होते या वेळी प्रमुख दिल्ली दरवाजात राजकीय भाकणूक झाली. त्यानंतर बहिरंभट,उखळ, खर्गतिर्थ, पेरणी,मुंगीचा धोंडा या ठिकाणी खर्गेमहाराज यांच्या करवी भाकणुक वर्तवण्यात आली. खर्गतिर्थ येथे खर्गे महाराज व भक्त हेगरस यांची गुरू शिष्य भेटीचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.शुक्रवार दि. १० रोजी सायंकाळी श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र मोहोळ कडे प्रयाण झाल्यानंतर यात्रेची सांगता होईल. मोहोळ, वडवळ,देगाव,मार्डी , नरंदे (कोल्हापूर) येथील मानकरी भाविक, संतमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणाच्या दिवशी गावातील विविध तरूण मंडळे, सामाजिक संस्था यांच्या वतीने भाविकांना दिवसभर मोफत अल्पोपहार, शीतपेय यांचे वाटप करण्यात आले. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटी,अन्नछत्र मंडळ, श्री नागनाथ देवस्थान यात्रा कमिटी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले यात्रेत
विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळ यांनी दिवसभर भाविकांना मोफत शीतपेये,अल्पओपहार वाटप केले

























