सोलापूर – मुळेगाव तांडा येथे दरवर्षी जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईला अखेर दिलासा मिळाला आहे. पोलीस प्रशासनाच्या “पहाट” उपक्रमांतर्गत येथे नवीन बोरवेलची निर्मिती करून ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आली.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गावभेटीदरम्यान मुळेगाव तांड्यातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेतली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
देशपांडे यांनी पुढाकार घेत नागपूरस्थित बेरार फायनान्स लिमिटेड या कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने आपल्या CSR फंडातून बोरवेल उभारण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला.
या बोरवेलचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी त्यांनी “ऑपरेशन परिवर्तन” आणि “पहाट” उपक्रमांद्वारे गावातील अवैध हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्यांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळकर, तसेच बेरार फायनान्सचे प्रतिनिधी संदीप जावंजळ, अभिजित महाजन, अशिष राठी, सतीश पोहाडरे व आशुतोष दुबे यांची उपस्थिती होती.
औषधी वनस्पती लागवडीचा नवा उपक्रम
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा मांडत गावागावांत औषधी वनस्पती लागवडीचा उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. त्यास मुळेगाव तांडा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 1 एकर जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली.
























