सोलापूर : एकात्मता म्हणजे वैचारिक एकता, बंधुता आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ असुनसुध्दा भारताची एकात्मता आणि अखंडता ही केवळ संविधान आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेमुळेच टिकून आहे. कुणीही या देशाची अखंडता नष्ट करू शकत नाही, असे प्रतिपादन प्रा. पंकज भारतीय (अमरावती) यांनी केले.
येथील सम्यक विचार मंचतर्फे दि. 11 ते 14 एप्रिल या कालावधीत रोज 6.30 वाजता डॉ. फडकुले सभागृहात मिलिंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवारी प्रा. पंकज भारतीय (अमरावती) यांनी ‘भारतीय संविधान आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी जेष्ठ शल्य विशारद डॉ. औदुंबर मस्के होते. विचार मंचावर शांतीकुमार कांबळे , रमेश सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. पंकज भारतीय यांनी रोखठोक शब्दात आपल्या विषयाची मांडणी केली. देशभरात मोठ्या प्रमाणात संविधान पुस्तके उपलब्ध आहेत मात्र संविधान हे अनेकांनी शोकेसमध्ये ठेवले आहे या संविधानाची अंमलबजावणी आणि आचरण करणे हेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते. 42 वी घटनादुरुस्ती करून एकात्मता हा शब्द वाढविण्यात आला. वास्तविक पहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना याची जाणीव होतीच मात्र त्यांनी एकात्मता या शब्दाला पर्यायी शब्द संविधानात एकता हा शब्द होता. यामुळे एकात्मता हा शब्द समाविष्ट करण्याची नंतर गरज नव्हती. भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन 76 वर्ष लोटले आहेत. संविधानातील कलम चार मध्ये भारत अखंड असेल असे नमूद केले आहे. ही अखंडता केवळ डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच टिकून आहे अन्यथा देशाचे अनेक तुकडे झाले असते.
दरम्यान सन 1976 मध्ये धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला. संविधानामध्ये यापूर्वीच शंभर अशी कलमे आहेत त्या धर्मनिरपेक्षता दिसून येतो. तो शब्द नसला तरी फरक पडला नसता, असे मत प्रा. पंकज भारतीय यांनी मांडले. सरकार कोणत्याही एका विशिष्ट धर्मासाठी देशाच्या पैसा वापरू शकत नाही. सर्व धर्मासाठी काम करू शकतो, ही धर्मनिरपेक्षता आहे.संविधानाचा मुळ पाया हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे व ही तत्वे बाबासाहेबांनी बुध्दाच्या तत्वज्ञानातुन घेतली आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माच्या लोकांना समान वागणुक देणे होय. भारतात सध्याची असलेली धर्मांधता आपल्यात एकात्मता रूजु देत नाही परंतु धर्मांधतेवर धर्मनिरपेक्षता हाच एकमेव उपाय आहे असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन अनेक जण मोठे झाले मात्र चळवळीसाठी झटतो का ? योगदान देतो का? तर त्याचे उत्तर नाही असे खेदाने नमूद करावे वाटते. याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. आंबेडकरी विचारसरणी अंगीकारली पाहिजे. चळवळीसाठी योगदान देणे ही खरी गरज आहे, असे आवाहन यावेळी प्रा. पंकज भारतीय यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजयानंद भालशंकर यांनी करून दिला.यावेळी सुधीर चंदनशिवे, चंद्रकांत कोळेकर, रविकांत ढावरे, शांतीकुमार कांबळे, अनिल जगझाप,मिलिंद ताकपेरे, वसंत कांबळे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.























