सोलापूर : शहरातील घोंगडे वस्ती परिसरातील ९ वर्षीय मुलाचा संशयित रेबीजमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.भटक्या कुत्र्याने जखम चाटल्याने ९ वर्षीय मुलाचा संशयित रेबीजने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पायाच्या जखमेवर सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने चाटल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. शहरातील मोकाट आणि पाळलेल्या कुत्र्यांना लसीकरणाचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलेला आहे.
समर्थ योगिनाथ स्वामी असे मयत बालकाचे नाव आहे. समर्थ स्वामी हा दहा-पंधरा दिवसाआधी खेळताना पडला होता. त्याच्या पायाला जखम झाली होती. या जखमेवर परिसरातील एका कुत्र्याने चाटले आणि त्यातून त्याच्या शरीरात रेबीजचा संसर्ग झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा शुक्रवारी शाळेत जाऊन आल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थता जाणवू लागली. पाणी पाहिल्यानंतर भीती वाटणे (हायड्रोफोबिया), जीभ बाहेर येणे, वाऱ्याचीही भीती वाटणे तसेच हात-पाय वाकडे होऊन आक्षेप येणे अशी रेबीजसदृश लक्षणे दिसू लागली. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रेबीजची शक्यता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र उपचार सुरू असतानाच मुलाचा मृत्यू झाला.
हा कुत्रा पाळीव नसून भटका होता. घटनेनंतर मृत मुलाच्या आई-वडिलांसह निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अँटी-रेबीज (ARV) लस देण्यात आली आहे.
वेळेत आवश्यक उपचार
मिळाले नाहीत : डॉ. राखी माने
याबाबत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांना विचारले असता, या बालकाला जिथे जखम होती, ती अजून ओली होती. त्यातच कुत्र्यासोबत खेळताना कुत्र्याने ती जखम चाटली आणि त्यातूनच त्या बालकाला रेबीजचा संसर्ग झाला. यात अजून एक मोठी चूक अशी आहे की, बालक जेव्हा अत्यावस्थ झाला. तेव्हा त्याला टिळक चौकातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सोलापूर शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेणे आवश्यक होते. इतर रुग्णालयात दाखल केले. वेळेत त्याला आवश्यक उपचार मिळाले नाहीत. रात्री पुन्हा त्या बालकामध्ये कुत्र्यासारखी तोंडाच्या बाहेर जीभ काढणे किंवा हातपाय वाकडे होणे असा प्रकार घडला आणि यातच त्या बालकाच्या मृत्यू झाला आहे. तरीही आम्ही सुरक्षिततेसाठी त्या कुटुंबातील आणि आजूबाजूच्या परिसरातील त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना अँटी रेबीज ची लस दिली आहे, असे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी स्पष्ट केले.
Post Views: 10