टेंभुर्णी – पोलीस ठाण्याने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणत साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सहा तोळ्यांची सोन्याची चैन (अंदाजे साडेचार लाख रुपये) व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
दि. ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री वरवडे ते व्होळे (ता. माढा) रस्त्यावर व्होळे गावाजवळील पुलाजवळ फिर्यादी ऋषिकेश अर्जुन गाडे (वय २९, रा. गुंफावाडी, ता. लातूर) हे मित्रासह जात असताना तीन अनोळखी इसमांनी बिगर नंबर प्लेटच्या मोटारसायकलवर येत त्यांची गाडी आडवी लावली. “आमच्यावर का थुंकला?” असा बहाणा करून फिर्यादी व त्याच्या मित्राला गाडीतून खाली ओढून मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील सहा तोळ्यांची सोन्याची चैन (अंदाजे साडेचार लाख रुपये) जबरदस्तीने ओढून नेली. तसेच मित्र सुनील यालाही मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाईल असा एकूण सुमारे चार लाख पासष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) अन्वये दि. १२ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्याकडे तपास सोपविण्यात आला.
गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी पुणे जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात शोधमोहीम राबवून पिंटू उर्फ लक्ष्मण भीमा गायकवाड (वय ३०) व योगेश अनिल भोसले (वय २१) यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेली सहा तोळ्यांची सोन्याची चैन (साडेचार लाख रुपये) हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड ‘बडा दोस्त’ वाहन (क्रमांक एमएच तेरा डी क्यू नऊ सात दोन तीन) जप्त करण्यात आले. एकूण साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा (करमाळा उपविभाग) व राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस हवालदार विलास नलावडे, संदीप गिरमकर, सुरज मुलाणी, मोहन तळेकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे हवालदार व्यंकटेश मोरे यांच्या पथकाने केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करीत आहेत.




















