सोलापूर – प्रतिष्ठा फाऊंडेशन तासगांव यांच्या वतीने दशक महोत्सवी साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी समृद्धी मल्टिपर्पज हाॅल तासगांव येथे करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात सोलापूर येथील ग्रामीण कथा लेखिका सौ. संध्या धर्माधिकारी यांचे कथाकथन, महाकवी संमेलन व समाजरत्न, साहित्यरत्न, कलारत्न, ग्रंथरत्न, कृषीभूषण, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. सोलापूर येथील ग्रामीण कथा लेखिका सौ. संध्या सूर्यकांत धर्माधिकारी यांच्या ‘बेरं’ कथासंग्रहाला या प्रतिष्ठा फाउंडेशनच्या ग्रंथरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रतिथयश मान्यवर साहित्यिकांच्या अनेक साहित्यकृती प्राप्त झाल्या होत्या. त्यातील उत्कृष्ट व दर्जेदार २६ साहित्यकृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड तज्ञ परिक्षकांनी अत्यंत पारदर्शकपणे केली असून हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी समृद्धी मल्टिपर्पज हाॅल तासगांव येथे संपन्न झाला आहे.
या सोहळ्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव अध्यक्षस्थानी होते तर उद्घाटक म्हणून जेष्ठ संपादक वसंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते मा. प्रदीपआप्पा कदम, जेष्ठ साहित्यिक भिमराव धुळूबुळू, बालसाहित्यिक महेशकुमार कोष्टी, शाहिर बजरंग आंबी, माजी प्राचार्य व्ही.एच. पाटील व प्रतिष्ठा फाऊंडेशन सर्वेसर्वा व निर्भिड पत्रकार तानाजीराजे जाधव, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्या जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. संध्या धर्माधिकारी यांच्या ‘बेरं’ या कथासंग्रहाला हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी त्यांचा ‘रकमा’ हा ग्रामीण कथासंग्रह देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेला आहे. सौ. संध्या धर्माधिकारी यांच्या कथाकथनलाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


















