सोलापूर – जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात वेग आणण्यास सुरुवात केली आहे. पदभार घेतल्यापासून त्यांनी आतापर्यंत पाच महत्त्वाच्या विभागांचा सविस्तर आढावा घेत प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात हालचालींना वेग आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ही त्यांची पहिलीच नियुक्ती असल्याने जैन हे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाची कार्यपद्धती, रचना, कर्मचारी व्यवस्था आणि प्रलंबित प्रश्न समजून घेण्यावर भर देत आहेत. कोणती कामे रखडली आहेत, ती का प्रलंबित राहिली, त्यामागील कारणे काय आहेत, याचा बारकाईने आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
सीईओ जैन यांनी आतापर्यंत बांधकाम विभाग क्रमांक दोन, आरोग्य विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, अर्थ विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतला आहे. या विभागांतील विविध योजना, विकासकामे, निधीची स्थिती, प्रशासकीय निर्णय आणि रखडलेल्या प्रस्तावांची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच येत्या पाच ते सहा दिवसांत उर्वरित सर्व विभागांचा देखील सविस्तर आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर जैन यांनी जिल्हा परिषद मुख्यालयातील शिस्तीवरही भर दिला आहे. कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात त्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून बहुतांश कर्मचारी वेळेवर कार्यालयात दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नव्या सीईओंच्या या भूमिकेमुळे प्रशासनात शिस्त लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कथित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत शासनाने झेडपीकडे माहिती पाठविल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याबाबत सीईओ कुशल जैन यांना प्रश्न विचारला असता, त्यावर संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती मागवून वस्तुस्थिती तपासली जाईल आणि त्यानंतर आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही सी. ई.ओ. कुशल जैन यांनी स्पष्ट केले.
नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कामकाजशैलीमुळे जिल्हा परिषद प्रशासनात जबाबदारी, शिस्त आणि कामकाजातील गती वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रलंबित प्रश्न निकाली काढणे, विभागीय कामकाजाला चालना देणे आणि कर्मचाऱ्यांमध्ये वेळेचे भान निर्माण करणे यावर त्यांनी सुरुवातीपासूनच भर दिल्याने आगामी काळात जिल्हा परिषद प्रशासन अधिक गतिमान होण्याची चिन्हे आहेत.
























