सोलापूर : शहरातील आसरा रेल्वे पुलाच्या कामासाठी अतिक्रमणामुळे अडथळे येत होते. गेल्या दोन वर्षापासून यासंदर्भात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन कडून महापालिकेला पत्र व्यवहार केला होता. अखेर आज महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने कारवाई करून तीन पक्क्या इमारती तीन पत्र्याची घरे आणि वॉल कंपाऊंड जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त केली.
सोलापूर शहरातील आसरा पूल (ब्रिज क्र. 458/5) प्रकल्पाला अतिक्रमणामुळे अडथळे निर्माण होत आहे. संबंधित विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नव्हती. या संदर्भात रेल्वे प्रशासन (एमआरआयडीसी) व संबंधित यंत्रणांकडून 22 जुलै 2022 पासून ते 29 जानेवारी 2024 पर्यंत विविध पत्रांद्वारे अतिक्रमण हटविण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती.
या प्रकरणावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती. या अतिक्रमणामुळे प्रस्तावित पुलाच्या बांधकामाच्या कामात अडथळे येत होते. प्रकल्पाच्या प्रगतीवर त्याचा थेट परिणाम होत होता. हा महत्त्वाचा शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्प असल्याने, कामातील विलंबामुळे शासनावर आर्थिक भार वाढत आहे तसेच नागरिकांच्या विकासकामांनाही फटका बसत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया करावी, अशी मागणी महाराष्ट्र रेल इन्फ्रान्स्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आली होती.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून अखेर आसरा रेल्वे पूल परिसरातील अडथळा ठरणारे अतिक्रमणे हटविण्यात आली. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात आज ही मोठी बेधडक कारवाई करण्यात आली.
अडथळा ठरणाऱ्या पाच पक्क्या इमारती, पत्र्यांची तीन घरे तसेच वॉल कंपाऊंड जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. कारवाई पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. हे अडथळे दूर केल्याने आसरा रेल्वे पुलाचे पुढील काम आता गतीने होणार आहे.



























