सोलापूर – शहरासाठी अत्याधुनिक रेल्वे स्टेशन जवळ ‘५ स्टार’ दर्जाचा नवीन बस पोर्ट उभारण्याची मागणी सोलापूर विकास मंचने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची हॉटेल बालाजी सरोवर येथे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
सोलापूर हे राज्यातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून, सध्या असलेले जुने एस.टी. स्थानक वाढत्या प्रवासी संख्येमुळे अपुरे पडत आहे. तसेच स्थानकाची विद्यमान अवस्था समाधानकारक नसल्याने नागरिकांमध्ये व प्रवाश्यां मध्ये नाराजी आहे. जुळे सोलापूर परिसरात सुद्धा एसटी स्टँड असणे गरजेचे आहे, नागरिकांनी अनेक वर्षांपासून सोलापूर नवीन बस पोर्टची मागणी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्टेशन जवळील भैया चौक येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या नरसिंग गिरजी (NG) मिलची जागा, नवीन बस पोर्टसाठी सुचविण्यात आली आहे. ही जागा सध्या नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (NTC) यांच्या ताब्यात असून, मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्याद्वारे योग्य नियोजन केल्यास बारामती व इंदापूरच्या धर्तीवर तसेच रेल्वे स्टेशन जवळ अत्याधुनिक 5 स्टार बस पोर्ट उभारता येऊ शकते, असे विकास मंचचे मत आहे.
पंढरपूर च्या आषाढी व कार्तिकी वारी, तुळजापूरच्या नवरात्रीला तसेच अक्कलकोट साठी लाखो भाविक देश भारतातून एस टी स्टँड चा वापर करतात. तसेच सध्याच्या एस टी स्टँड वर रेल्वे स्टेशन वरून जाण्यासाठी प्रवाश्यांना व भक्तांना रिक्षा द्वारे महागडा प्रवास करावा लागतो.
प्रस्तावित आराखड्यानुसार, सर्व एस.टी. बसेस मंगळवेढा रोडमार्गे शहराबाहेर वळवता येतील, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा मिळण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना हा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर त्यांनी ताबडतोब सेक्रेटरी यांना एनटीसीशी सोबत पत्र व्यवहार करण्याचे आदेश दिले
या भेटीदरम्यान सोलापूर विकास मंचचे केतन शहा, दत्तात्रय अंबुरे वकील, प्रसन्न नाझरे, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या भेटीचे आयोजन करण्यासाठी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अमोल शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.

























