बार्शी – शहरातील विस्कळीत व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी बार्शी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.बार्शी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या नावे देण्यात आलेले निवेदन उपमुख्याधिकारी राजाराम नरोटे यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक भागांमध्ये तब्बल ७ ते ८ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे, उजनी व चांदणी या दोन्ही पाणीपुरवठा योजना सुरू असतानाही शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शहरात पुरेशी साठवण क्षमता उपलब्ध असतानाही नियोजनाचा अभाव, वितरण व्यवस्थेतील त्रुटी, वाढलेली नळजोडणी संख्या, अपुरी मनुष्यबळ व्यवस्था, गळती आणि देखभाल दुरुस्तीतील दिरंगाई यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांना नियमित वेळापत्रक न देता अचानक पाणी बंद करणे, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे, काही भागांमध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी न पोहोचणे अशा समस्यांमुळे नागरिकांना टँकर, खाजगी विहिरी व विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असून त्याची दुरुस्ती वेळेत केली जात नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. उजनी व चांदणी योजनांच्या देखभाल दुरुस्तीची कामे, वॉल ओपनर, हातपंप दुरुस्ती यांसारख्या अत्यावश्यक सेवांची प्रलंबित बिले वेळेत न दिल्याने कामांमध्ये दिरंगाई होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
पाथरी पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी
ब्रिटिशकालीन नैसर्गिक उतारावर आधारित वीज खर्चाविना चालणारी पाथरी पाणीपुरवठा योजना रेल्वे ब्रॉडगेज कामावेळी बंद करण्यात आली होती. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ही योजना पुन्हा कार्यान्वित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच नगरपरिषदेच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवरून पाणीपुरवठा वेळापत्रक, व्यत्यय, गळती, दुरुस्ती याबाबत कोणतीही नियमित माहिती प्रसिद्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत असल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली.
पाणीपुरवठा विभागामध्ये आकृतिबंधानुसार आवश्यक अभियंते, तांत्रिक कर्मचारी व इतर पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर गंभीर परिणाम होत असून, आगामी संभाव्य सेवानिवृत्ती लक्षात घेऊन कोणतेही दीर्घकालीन नियोजन होत नसल्याची टीकाही करण्यात आली.
या निवेदनावेळी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, महेदीमियां लांडगे, बाळासाहेब पवार, नगरसेविका विद्या बंगाळे, सायरा मुल्ला, अमोल मांगडे, सचिन मांगडे,आकाश राऊत उपस्थित होते.

























