वेळापूर – जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम आणि स्वतःच्या कर्तृत्वावर असलेला दृढ विश्वास यांच्या बळावर पिसेवाडी (ता. माळशिरस) येथील सुपुत्र गणेश ज्ञानेश्वर वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात १२० वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आणि कोणत्याही प्रकारचे कोचिंग न घेता त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे पिसेवाडी व वेळापूर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गणेश वाघ यांचे माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल, वेळापूर येथे झाले, तर उच्च शिक्षणासाठी त्यांनी सांगोला येथे जाऊन बी.एस्सी. (केमिस्ट्री) पदवी पूर्ण केली. त्यांचे वडील शेतकरी असून घरची आर्थिक परिस्थिती मध्यम होती. शिक्षणाच्या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना त्यांनी हार न मानता सांगोला येथे मामाच्या आश्रयाने शिक्षण सुरू ठेवले. मामाच्या हॉटेलमध्ये काम करत, कष्टाची शिदोरी सोबत घेऊन त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर सांगोला येथील राजमाता अकॅडमीमध्ये दोन वर्षे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. मैदानावर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांना पाहून त्यांच्या मनातही खाकी वर्दी परिधान करण्याची प्रेरणा जागी झाली. त्या प्रेरणेतून त्यांनी स्वतः सराव सुरू केला आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत देत स्वतःचीही तयारी सुरू ठेवली. अखेर २०१८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात एसआरपी, सोलापूर येथे पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड होऊन त्यांनी आपल्या स्वप्नाची पहिली पायरी गाठली.
मात्र, गणेश वाघ यांची स्वप्ने इथेच थांबणारी नव्हती. पोलीस दलात सात वर्षे प्रामाणिक सेवा बजावत असताना विवाह, कुटुंब, मुलाचे संगोपन आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांच्या मनातील ‘पोलीस उपनिरीक्षक’ होण्याची जिद्द कायम धगधगत राहिली. आई-वडिलांची व पत्नीची भक्कम साथ, स्वतःची अभ्यासू वृत्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. २०२३ मध्ये पूर्व परीक्षा, २०२४ मध्ये मुख्य परीक्षा आणि २०२६ मध्ये मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करत अखेर ३० एप्रिल २०२६ रोजी घोषित झालेल्या निकालात पीएसआय पदावर यशाची मोहोर उमटवली.
“परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, मनात जिद्द आणि कृतीत सातत्य असेल तर यशाचा मार्ग नक्की खुला होतो,” हे गणेश वाघ यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी यशाने ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला असून, पिसेवाडी आणि वेळापूर परिसरासाठी त्यांचे हे यश निश्चितच अभिमानास्पद ठरले आहे.


























