सोलापूर – भर वेगातील ईरटीगा कार रस्त्यावर थांबवीलेल्या आयशर वाहनाला पाठीमागून जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात कार मधील दोघे मित्र जागेवर ठार झाले तर तिघे मित्र गंभीर जखमी झाले. तिघा जखमींना एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यातील एका मित्राचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज गुरुवारी पहाटे एक वाजता पुणे हैदराबाद बायपास मार्गावरील डी मार्ट – पर्ल गार्डन जवळ घडला.
अमोल धैर्यशील येरटे (वय ४० वर्ष, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर),शेखर सुरेकर (वय ३३ वर्ष, रा. कुमठा नाका, सोलापूर) आणि कादर सैदू हांडे (वय ३३ वर्ष , रा. कुमठा नाका, सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्या तिघा मित्रांची नावे असून त्यातील कादर सैदू हांडे याचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. तर स्वरुप कोथींबीरे (वय २७ वर्ष, जुनी मिल चाळ, सोलापूर) आणि अमित राजेश जाधव (वय ३० वर्ष, रा. पांडुरंग वस्ती, शास्त्री नगर, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
वरील पाचही मित्र हे मध्यरात्री पुना नाका येथील एका ढाब्यावर जेवण करून ईरटीका कार (क्रमांक MH १३ EK ७२०१) मधून घराकडे परतत असताना त्यांची कार हैदराबाद बायपास रस्त्यावरील डी मार्ट – पर्ल गार्डन जवळ उभ्या असलेल्या आयशर ( क्रमांक MH १३ CU ८६९९) या वाहनावर पाठीमागून जोरात आदळली.या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले . जखमींना एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले .अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ईरटीगा कार तब्बल दीडशे मीटर फरपटत जाऊन त्यावरील पत्र्याचे छत पूर्ण कापले जाऊन बाजूला पडले .
दरम्यान अपघाताची खबर समजताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचून मृतदेह शव विच्छेदनासाठी पहाटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले .आणि खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेला कादर हांडे यांचा सकाळी मृत्यू झाला .
यातील मयत शेखर सुरेकर हा अविवाहित असून तो एका खासगी फायनान्स कंपनीत कामास होता. त्याच्या पश्चात आई आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दुसरा मयत अमोल येरटे हा अक्कलकोट रोडवरील आदर्श सुझुकी मध्ये सिनिअर मॅनेजर म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. तसेच तिसरा मयत कादर हांडे हा देखील आदर्श सुझुकी मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .



























