सोलापूर – निलम नगर, एमआयडीसी येथील श्री सद्गुरू रेणवासिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठ ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव-२०२६ हा धार्मिक व भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून, या यात्रा महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धाराम खजूरगी आणि उपाध्यक्ष सुनील अरळीकट्टी यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही देवी भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी महाअभिषेक व महाआरतीने कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर जलकुंभ मिरवणूक, सुवासिनी ओटी भरणे, महाप्रसाद तसेच रात्री बाळबटृल यात्रा उत्साहात पार पडणार आहे शनिवार दि. १६ मे रोजी कुंभ कार्यक्रम तसेच श्री चौडेश्वरी देवी ओटीभरण आणि सवाद्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १७ मे रोजी नरसिंह कडी आटा आणि सवाद्य मिरवणुकीने यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रा महोत्सव समितीत अध्यक्ष गुंडप्पा अरळीकट्टी, उपाध्यक्ष शंकर धोडमनी, सचिव बसवराज हरनूर, सहसचिव बसवराज कल्लुर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


















