अज्ञात चोरट्याने बस मध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल लांबविला
सोलापूर : अज्ञात चोरट्याने एका प्रवाशाच्या खिशातील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शांती चौक येथे ११ मे रोजी दुपारी घडली.
यातील फिर्यादी संगय्या बसय्या हिरेमठ (रा. नागणसुर, ता. अक्कलकोट) हे ११ मे रोजी दुपारी शांती चौक येथे बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल हातोहात लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार शेख हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करताना एकाला दुचाकी सह पकडले – ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका दुचाकी स्वाराला अन्न व औषध प्रशासनाने कलावती नगर भागात रंगेहात पकडले.
दरम्यान याप्रकरणी महेश ज्ञानेश्वर खानौरे (रा. सुनील नगर, सोलापूर) याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतअन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महेश हा त्याच्या मोटरसायकल वरून राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधी तंबाखू घेऊन जाताना अन्न व औषध प्रशासनच्या पथकाला रविवारी सकाळी कलावती नगरात सापडून आला. यावेळी त्याच्या ताब्यातून ३४ हजार ८३० रुपये किमतीच्या पानमसाल्याच्या ५० पुड्या, गुटख्याची ६ पाकिटे, याशिवाय विविध प्रकारची तंबाखू आणि गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक दुचाकी जप्त करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार बनसुडे हे करीत आहेत .
उकाड्यामुळे अंगणात झोपलेल्या महिलेचा मोबाईल चोरीस
सोलापूर : घराबाहेर अंगणात झोपलेल्या एका महिलेचा ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गैबीपीर नगर येथे १६ मे रोजी घडली.
दरम्यान याप्रकरणी उज्वला विष्णू कांबळे (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्हाच्या त्रासामुळे फिर्यादी या १६ मे च्या रात्री घराबाहेर अंगणात झोपल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल चोरून नेला. ही चोरी दुसऱ्या दिवशी पहाटे उघडकीस आली.हवालदार कुंभार हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 10