सोलापूर : महापालिका नगररचना विभागाकडून अनधिकृत बांधकाम पाडकामाची शहरात गुरुवारी तिसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली. न्यायालयात प्रकरण नसलेले पण ९६ बोगस बांधकामांमध्ये एक असलेल्या मजरेवाडी परिसरातील सहारा नगर येथील ६ मजली इमारती खालील पार्किंग मधील अनाधिकृत गाळे जमीनदोस्त करण्यात आले. त्यांना महापालिकेच्या नगररचना विभागाकडून २४ तासाची नोटीस देण्यात आली होती.
महापालिकेतून समांतर प्रक्रिया राबवून महापालिकेतील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमताने शहरातील विविध भागातील अनेक इमारतींना बोगस सही शिक्क्यासह विनानोंदीचे बांधकाम परवाने आर्थिक व्यवहार करून बहाल करण्यात आले होते. हा प्रकार उजेडात येताच केलेल्या चौकशीत मात्र प्राथमिक स्वरूपात ९६ बांधकामे बोगस परवाना असलेली आढळून आली होती. आशा बोगस आणि आणखी खूप बांधकामांवर हातोडा मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यानुसार सद्या ही कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या नगररचना बांधकाम परवाना विभागाकडून महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या मदतीने आत्तापर्यंत या ९६ बोगस बांधकाम प्रकरणांमधील नोटीसा बजावल्यानंतर विविध भागातील ६ इमारतीमधील अनधिकृत बांधकामे, पत्रा शेड व इतर अतिक्रमण जेसीबीच्या माध्यमातून पूर्णपणे पाडण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील मजरेवाडी परिसरातील होटगी रस्त्यावरील सहारा नगर येथील सिद्दिकी यांचे ‘जी प्लस सहा’ या बहुमजली इमारतीमधील पार्किंगच्या संपूर्ण जागेत बांधण्यात आलेले अनधिकृत दोन दुकान गाळे आणि इतर अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या माध्यमातून पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. इमारत धारकांनी बांधकाम पाडण्यास विरोध करून गोंधळ केला. अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने केवळ पार्किंग मधील अनधिकृत बांधकाम पाडत असल्याचे समजावून सांगून अवघ्या तासाभरात या इमारती खालील पार्किंगच्या जागेतील दुकान गाळे, पत्राशेड आणि इतर अनधिकृत बांधकाम पूर्णपणे पाडून पार्किंग जागा मोकळी केली.
या इमारती आता रडारवर
आता महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाच्या, न्यायालयात न गेलेल्या आणि ९६ प्रकरणातील अनेक इमारती पाडकामासाठी टार्गेटवर असून न्यायालयाने दिलेल्या २५ मे पर्यंतच्या स्थगिती आदेशानंतर पुन्हा जोमाने कारवाई मोहीम सुरू होणार असल्याचे व सध्या न्यायालयात नसलेल्या प्रकरणातील इमारतींचे अनाधिकृत भाग पाडण्यात येणार असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
Post Views: 16