अक्कलकोट :- महाराष्ट्र – कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे सुपुत्र जन्मतः अंध असूनही आपल्या जिद्द, मेहनत आणि अद्भुत संगीतकलेच्या जोरावर देश-विदेशात आपल्या कलेचा ठसा उमटविणारे झी कन्नड सारेगमप सीझन १९ चे फायनलिस्ट रेवणसिद्ध पुंडलीक फुलारी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कतार कर्नाटक संघाच्या वतीने ६ नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘करुनाड वैभव’ या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व संगीत कार्यक्रमासाठी रेवणसिद्ध फुलारी यांची विशेष निवड झाली आहे.
या भव्य आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाला कर्नाटक विधानसभेच्या उपाध्यक्षा व प्रसिद्ध अभिनेत्री उमाश्री मॅडम, प्रसिद्ध कॉमेडी कलाकार जग्गप्पा, सुश्मिता, राघवेंद्र (रागिणी) तसेच प्रसिद्ध गायक मेहबूब साब आणि अँकर प्रणिता यांच्यासह अनेक मान्यवर कलाकार उपस्थित राहून आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. अशा नामवंत कलाकारांसोबत एकाच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर रेवणसिद्ध यांना आपली संगीतकला सादर करण्याची संधी मिळणार आहे.कर्नाटक कतार संघाचे अध्यक्ष सुब्रमण्या हेब्बगेळू उपाध्यक्ष अनिल भासगी
सरचिटणीस सुजीत कुमार
सांस्कृतिक सचिव भावना नवीन तसेच सर्व समिती सदस्यांनी रेवणसिद्धला संधी दिल्याने त्यांचे ही मनःपूर्वक धन्यवाद.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सीमाभागातून आपल्या संगीतप्रवासाला सुरुवात करणाऱ्या रेवणसिद्ध यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर झी कन्नडच्या ‘सारेगमप’ या प्रतिष्ठित मंचावर स्थान मिळविले. जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता संगीताची साधना सुरू ठेवली. गदग येथील वीरेश्वर पुण्याश्रमात पंडित व्यंकटेश आलकूड यांच्या मार्गदर्शनाखाली ते हिंदुस्थानी संगीताचे शिक्षण घेत आहेत.
रेवणसिद्ध हे केवळ उत्तम गायकच नाहीत, तर हार्मोनियम, तबला, की-बोर्ड, रिदम पॅड आणि वीणा यांसारखी विविध वाद्येही वाजवतात. त्यांनी सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडॉल’ या स्पर्धेत सहभाग घेऊन तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली आहे. स्वतः गीतलेखन, संगीत संयोजन आणि गायन करण्याचीही त्यांची कला आहे.
कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील विविध ठिकाणी त्यांनी संगीत कार्यक्रम सादर केले आहेत. ज्येष्ठ व नामवंत कलाकारांसोबत मंचावर गायन करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. प्रसिद्ध अभिनेता दर्शन यांच्या काटेरा चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमातही त्यांनी आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी त्यांना मुंबईला बोलावून विशेष सन्मान केला आहे.
आता कतार कर्नाटक संघाच्या ‘कन्नड वैभव’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी झालेली निवड ही त्यांच्या संगीतप्रवासातील आणखी एक महत्त्वाची पायरी ठरली आहे. कतारच्या भूमीत आपल्या सुमधुर आवाजातून कन्नड संगीत आणि भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करण्याची संधी रेवणसिद्ध यांना मिळणार आहे.
या निवडी बद्दल कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,गोवा आणि केरळ राज्यातील सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक साहित्यिक,सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार,गायक, कॉमेडी कलाकार आदींनी अभिनंदन करून पाहिली विदेश संगीत शुभेच्छा देत आहे.
कोट:-
“संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना घरातील विविध वस्तूंना वाद्यांची साथ बनवत तबला, हार्मोनियम, रिदम पॅड आणि कॅशियो वादनाचे कौशल्य आत्मसात केले. आज साहित्य लेखनाच्या क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून, आतापर्यंत ६० हून अधिक गाणी लिहिली आहेत. त्यापैकी १० गाण्यांचे रेकॉर्डिंगही पूर्ण झाले आहे.
स्वतःच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि संगीत क्षेत्रातील स्वप्नांना नवी दिशा मिळावी यासाठी स्वतःचा संगीत स्टुडिओ उभारण्याचा ध्यास आहे. या स्वप्नाला दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व संघटनांनी मदतीचा हात दिल्यास या कलागुणांना निश्चितच मोठी झेप मिळेल. योग्य संधी, सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात सिनेसृष्टीत एक यशस्वी आणि नामांकित संगीत दिग्दर्शक म्हणून नक्कीच नावारूपाला येण्याची क्षमता त्याच्यात आहे.”
Post Views: 12