सोलापूर : शारदीय नवरात्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री रूपाभवानी माता मंदिराकडे येणाऱ्या तसेच तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवरात्रोत्सवात सोलापूरसह जिल्ह्यातून हजारो भाविक रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविक अनवाणी पायाने मंदिराकडे जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे आणि अडथळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे, रस्त्यांची डागडुजी करणे आणि अडथळे दूर करण्याची मागणी पाटील यांनी केली.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रूपाभवानी मातेच्या दर्शनानंतर अनेक भाविक तुळजापूरकडे पायी जातात. या मार्गाचीही विशेष पाहणी करून रस्ते व स्वच्छतेच्या समस्या दूर कराव्यात.मंदिर परिसर व भाविकांच्या मार्गावरील कचरा नियमित उचलणे, औषध फवारणी करणे, विशेष स्वच्छता मोहीम राबविणे आणि उत्सवकाळात अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी. नवरात्रोत्सवाच्या आधीच ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी पाटील यांनी केली.
—
Post Views: 16