अक्कलकोट : लिंगायत समाजातील उद्योजकांची संघटना असलेल्या विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन, इंडियाच्या वतीने दहा समाजबांधवांना ‘बसव उद्योजक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या संघटनेचे अध्यक्ष अनिल मंद्रुपकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अक्कलकोट येथील लायन्स इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे महासचिव गणेश बिराजदार, सचिव अमित पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी राज मिरजे, आनंद बेल्लाड, ऋषिकेश शेरकर, गणेश माळी, सीए हनुमंत राव, प्रियांका हापसे, राहुल जिगजीणी, समीर साखरे, विजय लिंगायत यांना ‘बसव उद्योजक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात अनिल मंद्रुपकर यांना दिल्ली येथे मानाचा अटल सेवा पुरस्कार व फ्रान्स येथील थीम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे राजशेखर कापसे यांनी विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन या संघटनेच्या कार्याबद्दल कौतुक करून, पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे अभिनंदन केले व तरुणांनी उद्योगाकडे वळावे असे आवाहन केले. विकसित भारत मिशनअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन युवकांमध्ये उद्यमशीलता रुजावी, तसेच त्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाठी कार्यरत असल्याचे अनिल मंद्रुपकर यांनी नमूद केले. गणेश बिराजदार यांनी आभार मानले.