
सोलापूर — जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कर्जवितरणाची प्रगती, खातेउघडणीचे कामकाज आणि समितीने बँकांसमोर ठेवलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यात आला.
बैठकीत बँकांनी नेमून दिलेले टारगेट शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले. उद्दिष्टपूर्ती वेळेत साध्य करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आला. तसेच प्रत्येक बँकेने 75 टक्के खाते उघडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी सूचना करण्यात आली.
काही बँकांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करून ठरवून दिलेले पीक कर्ज पूर्ण न करणे किंवा शासकीय योजना राबविण्यात झालेल्या दिरंगाईबाबत ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बंधन बँक आणि करूर वैश्य बँक यांना नोटीस काढण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत नाबार्ड, ओबीसी महामंडळ, कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र (DIC) यांचा आढावा घेण्यात आला. योजनांची प्रगती, निधी उपलब्धतेची स्थिती तसेच अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली.
कर्ज मंजुरी किंवा नकार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला. ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते, त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळविण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत सर्व बँकांनी जबाबदारीने कामकाज करून उद्दिष्टपूर्ती साध्य करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. प्रगतीचा पुढील आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेतही देण्यात आले.
यावेळी बँक अधिकारी राम वाखार्डे, बँक अधिकारी कदम , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उमेशचंद्र दंडगव्हाळ, वृषाली लहारे जिल्हा व्यवस्थापक ओबीसी वित्त-विकास महामंडळ सोलापूर.






















