पंढरपूर – स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळ पंढरपूर संचलित सावरकर मुक्तद्वार वाचनालयाच्या वतीने स्वा. सावरकर जयंती व्याख्यानमाला २०२६ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळवेढेकर यांनी दिली.
व्याख्यानमाले संदर्भात माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष मंगळवेढकर यांनी सांगितले की, सावरकर पथ येथील ‘स्वा. सावरकर क्रांतिमंदिर’ मध्ये मंगळवार, दिनांक २६ ते २८ मे या कालावधीत दररोज सायंकाळी ठीक ६ वाजता व्याख्यान सुरू होईल. तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे प्रबोधन पंढरपूरकरांना ऐकायला मिळणार आहे.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी(२६ मे) प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सुनील उंबरे हे ‘माझीफोटोग्राफी’ या विषयावर आपले अनुभव मांडतील. दुसऱ्या दिवशी बुधवारी (२७ मे) अभय उत्पात यांचे ‘संघ शताब्दी आणि पंचपरिवर्तन’ या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान होईल. शेवटच्या दिवशीगुरुवारी (२८ मे) सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्वप्नील वाडदेकर हे ‘नेटच्या युगात स्वसंरक्षण’ या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
व्याख्यानमाले व्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गुरुवारी ( दि.२८मे) सकाळी ८:३० वाजता स्वा.सावरकर यांच्या पुतळ्याचे पूजन अत्यंत उत्साहात करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन सावरकर प्रेमी मंडळ व स्वा. सावरकर मुक्तद्वार वाचनालय कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
या व्याख्यानमालेस तसेच सावरकरांच्या जयंती निमित्त आयोजिण्यात आलेल्या इतर कार्यक्रमांना पंढरपूर आणि परिसरातील सर्व राष्ट्रप्रेमी व सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितरहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळवेढेकर यांनीकेले आहे.
Post Views: 7