सोलापूर : शहरातील महापालिका प्रसूतीगृहांमधील वाढता रुग्णभार आणि काही ठिकाणी जाणवणारी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आरोग्य विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी ३ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि २ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण ५ महिला डॉक्टरांच्या अंतर्गत बदल्या केल्या.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तातडीच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाकडून भर देण्यात येत आहे. यानुसार गरजेप्रमाणे महिला डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या आदेशातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘ऑन इमर्जन्सी कॉल’ ही नवी कार्यपद्धती आहे. प्रसूतीसारख्या तातडीच्या सेवेत एक मिनिटही महत्त्वाचा असतो. त्यामुळे डॉ. मृणाल खंदारे व डॉ. दिपाली गावडे या दोन स्त्रीरोगतज्ज्ञांकडे आता दोन- दोन प्रसूतीगृहांची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. मृणाल खंदारे साबळे प्रसुतीगृहासह रामवाडी प्रसूतीगृह, तर डॉ. दिपश्री गाडवे या चाकोते प्रसुती गृहासह जिजामाता प्रसूतीगृहाची जबाबदारी ‘ऑन इमर्जन्सी कॉल’ तत्त्वावर सांभाळणार आहेत. एकाचवेळी दोन ठिकाणची जबाबदारी दिल्याने मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर करून रुग्णसेवेला गती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तसेच स्त्री रोगतज्ञ डॉ. रेणुका लहांडे यांची रामवाडी प्रसुती ग्राहतून पु. रा. अहिल्यादेवी होळकर प्रसुतीसहात, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली नागणे यांची दाराच्या प्रसुतीगृहातून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहात आणि वैद्यकीय अधिकारी पूजा वाघमारे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रसुतीगृहातून दाराशाच्या प्रसूतीगृहाकडे बदली करण्यात आली आहे.
कोणत्याही मातेला उपचाराअभावी त्रास होऊ नये
शहरातील सर्व प्रसूतीगृहांमध्ये २४ तास सेवा सुरू राहावी आणि कोणत्याही मातेला उपचाराअभावी त्रास होऊ नये या एकमेव उद्देशाने हे बदल केले आहेत, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सर्व संबंधित डॉक्टरांना पुढील आदेश होईपर्यंत नवीन ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विशेषतः रामवाडी, जिजामाता व दाराशा प्रसूतीगृहातील सेवा अधिक बळकट होणार असल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले.
Post Views: 15