सांगोला – गुरुवार दि.२८ मे रोजी बकरी ईद निमित्त सांगोला शहरातील ईदगाह मैदान येथे तसेच तालुक्यातील सर्व मशिदीमध्ये बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी हाजी शब्बीरभाई खतीब यांनी खुतबा पठण केले व उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांना बकरी ईद अर्थात ईद-उल आजहा या सणाचे महत्त्व समजावून सांगितले. या सामूहिक नमाज पठन प्रसंगी परंपरेप्रमाणे मुल्ला कुटुंबीयातील जेष्ठ सदस्य हाजी इब्राहिम मुल्ला यांनी अजान पठण केली व शहर काझी, आलमशा काझी यांनी इमामात करत नमाज पठण केली.
नमाज संपन्न होताच हाजी शब्बीरभाई खतीब यांनी अल्लाह चरणी आपल्या भारत देशातील सामाजिक सलोखा टिकून रहावा व देशाची संपूर्ण जगभरामध्ये प्रगती व्हावी त्यासह नैसर्गिक आपत्ती होऊ नये शेतकरी व सर्वच नागरिक आनंदी राहावेत आरोग्यदायी राहावेत यासाठी दुवा केली. नमाज पठण संपन्न झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.