
सोलापूर – शहरातील वसंत विहार परिसरामधील माऊली दूध पंढरी ते दानेश्वरी नगर या मार्गावरील काँक्रिटीकरण रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे, काँक्रेट रस्ता तयार होऊन अवघ्या एक वर्षाच्या आतच या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. या भेगांमुळे दुचाकी व चारचाकी वाहने अडकत असून परिसरात लहान-मोठे अपघात नियमित घडत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सध्या पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भेगा आणखी वाढण्याची शक्यता असून, रस्त्याचा योग्य अंदाज न आल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वसंत विहार येथील स्थानिक नागरिक आनंद व्हटकर यांनी केली आहे.















