
सोलापूर – शहरात ईद-उल-अजहा सण धार्मिक उत्साह, श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सोलापुरातील होटगी रोड शाही आलमगीर ईदगाह, रंगभवन येथील अहले हदिस, पांगल मैदानातील आलमगीर, जुना आदिलशाही व असार मैदान ईदगाह या प्रमुख पाचही ईदगाह मैदानांवर सकाळी ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली.
पहाटे 6 वाजले पासूनच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह मैदानांकडे येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नवीन कपडे, डोक्यावर टोपी आणि हातात नमाजची चटई घेऊन लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ईदच्या नमाजसाठी दाखल झाले होते. यासोबतच शहरातील मुस्लिम बहुल भागातील मोठ्या मशिदी तसेच विविध भागातील प्रमुख मस्जिदींमध्येही ईदच्या नमाजासाठी मोठी गर्दी झाली होती.संपूर्ण शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
नमाजपूर्वी मौलाना-धर्मगुरूंनी ईद-उल-अजहाचे धार्मिक महत्त्व सांगत समाजात शांतता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. ईद-उल-अजहा ही अल्लाहसाठी त्याग, बलिदान आणि समर्पणाची भावना व्यक्त करणारी ईद असल्याचे त्यांनी नमूद केले. नमाज पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी लहान मुलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.शहरातील विविध भागात सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ईदच्या निमित्ताने अनेक मुस्लिम कुटुंबांकडून कुर्बानीची धार्मिक प्रथा पार पाडण्यात आली. इस्लाम धर्मातील परंपरेनुसार अल्लाहसाठी त्यागाची भावना व्यक्त करत कुर्बानी देण्यात आली. त्यानंतर गरजू आणि गरीब नागरिकांमध्ये मांस वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. दरम्यान,हज यात्रेच्या पार्श्वभूमीवरही या ईदला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, अशी इस्लाममध्ये मान्यता आहे.
ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांकडून प्रमुख ईदगाह मैदान, मशिदी आणि गर्दीच्या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक शाखेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण सण शांततेत आणि उत्साहात पार पडला.
चौकट
ईद-उल-अजहाची परंपरा प्रेषित हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आणि त्यांचे पुत्र हजरत इस्माईल अलैहिस्सलाम यांच्या त्यागाशी जोडली जाते. अल्लाहच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रेषित इब्राहिम यांनी आपल्या पुत्राचा त्याग करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांच्या या निष्ठा आणि बलिदानाच्या भावनेमुळे अल्लाहने त्यांना मोठा दर्जा दिला आणि त्याच स्मरणार्थ ईद-उल-अजहा साजरी केली जाते,असा उल्लेख धर्मगुरूंनी यावेळी केला.
चौकट
धर्माच्या नावावर समाजात तेढ आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रोपोगेंड्यापासून तरुणांनी दूर राहावे. चांगले शिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी केले. तसेच सर्व धर्मगुरूंनी आपल्या प्रवचनातून एकता, बंधुता आणि शांततेचा संदेश देत समाजात सलोखा कायम राखण्यासाठी प्रयत्न करावेत,असेही त्यांनी ईदनिमित्त सांगितले.
















