पंढरपूर – नेहमीच पोलिस कठोर असतात असे नाही. कारण पोलिस असले तरी ते देखील माणसेच आहेत. त्यांना देखील काळीजआहे, माया, प्रेम आहे. ते देखील कुणाचे तरी मुले, आईवडील आहेत . त्यांना देखील नातीगोती असतात हे येथील निर्भया पथकाच्या कामगिरीवरुन दिसून आले आहे. कारण येथील निर्भया पथकाकडून पंधरा दिवसापूर्वी घर सोडून मुंबईतून येथे आलेल्या मुलाला पुन्हा त्याच्या आईवडीलांच्या छत्रछायेत विसावा देण्याचे कार्य केले गेले आहे. पोलिसांनी केलेल्या या कार्याची वरिष्ठांकडून देखील दखल घेऊन सहाजिकच निर्भया पथकातील पोलिसांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे.
येथील निभर्या पथकाची टिम नेहमी प्रमाणे सोमवारी (ता.२५ मे) पेट्रोलिंग करित असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात एक मुलगा काही दिवसां पासुन फिरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळालेली होती. त्या नंतर पथकातील पोलिसांनी या मुलाचा मंदिर परिसरात शोध घेऊन संबंधित मुलाला मंदिर परिसरातून शोधुन काढले.
पथकातील पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क केला. मात्र पथकातील पोलिसांना कोणत्याहीप्रकारची माहीती तो सांगत नव्हता. तरी निर्भयापथकाने त्याचे समुपदेशन करुन त्याच्याकडून सर्व माहीती जाणून घेतली. सुरेश गिरी (वय १७ वर्षे) असे त्याचे नाव असून तो (रा.नालासोपारा ) मुंबई येथील असल्याचे पोलिसांना समजले. माहिती जाणून घेत असताना सुरेश गिरी हा गेली पंधरा दिवस झाले घरात कोणास, काहीही न सांगता पंढरपूरला निघुन आलेला असल्याची धक्कादायक माहिती देखील पुढे आली. त्यानंतर पथकातील पोलिसांकडून त्याचे आई वडील व नातेवाईक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु झाला. दरम्यान आईवडीलांशी संपर्क होईपर्यंत येथील औदुंबररावजी पाटील बालकाश्रमात त्याची रवानगी करण्यात आली.
त्यानंतर त्याच्या आईवडिलांचा ठावठिकाण्याची माहिती घेऊन नालासोपारा (मुंबई) येथे त्यांच्याशी पोलिसांकडून संपर्क केला गेला. विशेष म्हणजे सुरेशच्या आईवडिलांची परिस्थिती देखील बेताचीच असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे मुंबई येथून पंढरपूरला जाण्या येण्याचा खर्च देखील करण्याची त्यांची परिस्थिती नाही हे समजून आल्यानंतर निर्भया पथकातील पोलिसांकडून त्याच्या वडीलांना पंढरपूरला येण्याजाण्यासाठी पैसे पाठविण्यात आले. त्यानंतर वडील येथे आल्यावर सुरेश गिरीला गुरुवारी (ता.२८) त्याच्या आईवडिलांच्या सावलीत पुन्हा पाठविण्याची कार्यवाही केली गेली.
निर्भया पथकाच्या मानवतेच्या
दृष्टीकोनातून केलेल्या या कामगिरी बद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतूक करुन त्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
Post Views: 9