बार्शी – मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी केल्याच्या किरकोळ कारणावरुन एका दाम्पत्याला लोखंडी हुक व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बार्शी शहरातील जयशंकर मिलसमोरील आगळगांव रोड परिसरात घडली. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी भिकू भडकवाड (वय ४०, रा. जयशंकर मिलसमोर, अगळगाव रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विकास बगाडे, विशाल उर्फ दादा बगाडे आणि अनिता बगाडे (सर्व रा. जयशंकर मिलसमोर, अगळगाव रोड, बार्शी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २७ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बालाजी भडकवाड हे घराकडे जात असताना रस्ता अरुंद असल्याने त्यांनी आपली मोटारसायकल बगाडे किराणा दुकानाजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली. याच कारणावरुन आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी लोखंडी हुकने बालाजी भडकवाड यांच्या डाव्या पायावर वार केला तसेच डोक्यावर, कानावर व गालावर बुक्क्यांनी मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी दिव्या यांनाही पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेत बालाजी भडकवाड व त्यांची पत्नी दिव्या भडकवाड हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दवाखान्यात नोंदविण्यात आलेल्या जबाबाच्या आधारे बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चौगुले करीत आहेत.
Post Views: 9