सोलापूर : न्यायालयातील दिवाळखोरीचे प्रकरण लपवून ठेवून बी हेवी मॉलासेस व सी हेवी मॉलासेस खरेदी व्यवहारात चेन्नई येथील एका कंपनीची तब्बल १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड मधील शिंदे परिवारातील चार संचालकांविरुद्ध फौजदार चवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील आरोपींनी फिर्यादीच्या आयडी पॅरी इंडिया लिमिटेड, चेन्नई या कंपनीसोबत बी हेवी मॉलासेस व सी हेवी मॉलासेस पुरवठ्याबाबत करार केला होता. मात्र, गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध एनसीएलटी, मुंबई खंडपीठ क्रमांक १ येथे दिवाळखोरीसंदर्भातील अंतिम आदेश २७ जून २०२४ रोजी झालेला असतानाही ही बाब कंपनीपासून लपवून १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपयांची आगाऊ रक्कम आरटीजीएसद्वारे ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेतील गोकुळ साखर कारखान्याच्या खात्यावर जमा करण्यात आली. मात्र, करारानुसार मालाचा पुरवठा करण्यात आला नाही तसेच आगाऊ रक्कमही परत करण्यात आली नाही .याशिवाय, आरोपींनी संगनमत करून संबंधित रक्कम इतर खात्यांमध्ये, तसेच गोकुळ शुगर चा डायरेक्टर – गणपत दत्ता शिंदे या आरोपीच्या पत्नीच्या खात्यावर आणि युवा गारमेंट या व्यवसायाच्या खात्यावर वळती करून घेतली .आणि खात्यात शिल्लक नसताना पुढील तारखेचे धनादेश देऊन कंपनीची फसवणूक केली .हा प्रकार सप्टेंबर २०२४ पासून आजतागायत नविपेठ येथील युवा गारमेंट येथे घडल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. काळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.


















