सोलापूर – स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत उमेदवारी जाहीर केली आहे. रविवारी रात्री उशिरा भाजपच्या केंद्रीय निवड समितीने विविध विधान परिषद जागांसाठी उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये सोलापूर मतदारसंघासाठी राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
येत्या १८ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या आणि विद्यमान राजकीय गणित पाहता भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने पक्षाचा उमेदवार कोण असेल, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
उमेदवारीसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत परिचारक यांच्यात चुरशीची स्पर्धा असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी संघटनात्मक अनुभव, स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि राजकीय स्वीकारार्हता या निकषांवर राऊत यांच्यावर विश्वास दाखवला.
बार्शी नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामकाजाच्या अनुभवामुळे राजेंद्र राऊत यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क, संघटन बांधणीतील योगदान आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.
भाजपने राऊत यांना उमेदवारी देत सोलापूरच्या राजकारणात स्पष्ट राजकीय संदेश दिला असल्याचे मानले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील बहुमताचे गणित लक्षात घेता भाजपचा विजयाचा दावा अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उमेदवारी जाहीर होताच जिल्हाभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी स्वागत आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. आता या निवडणुकीत विरोधक कोणती रणनीती आखतात आणि भाजपचे संख्याबळ प्रत्यक्ष मतदानात कितपत प्रभावी ठरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Post Views: 8