बार्शी – मार्केट यार्डातील भागीदारीच्या वादातून व्यापारी विकास महादेव गुळमिरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी संजय लक्ष्मण केवळे यांची बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी हा निकाल दिला.
फिर्यादी वैशाली विकास गुळमिरे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत विकास गुळमिरे व आरोपी संजय केवळे हे कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी येथील गाळा क्रमांक २ मध्ये भागीदारीत भुसार मालाचा व्यवसाय करीत होते. व्यवसायातील आर्थिक व्यवहार, हिशोबातील मतभेद, गाळा सोडण्याचा तगादा तसेच सततचा मानसिक त्रास व दमदाटी यामुळे विकास गुळमिरे यांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी गाताचीवाडी शिवारातील दगड खाणीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.
तपासादरम्यान, आत्महत्येपूर्वी मृत व्यक्तीने व्यापारी मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर संदेश पाठवून आरोपीस आपल्या मृत्यूस जबाबदार धरल्याचा मजकूर समोर आला होता. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात खटला चालविण्यात आला. खटल्यादरम्यान साक्षीदारांचे जबाब, दस्तऐवजी पुरावे, तपासातील कागदपत्रे तसेच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आला. बचाव पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या युक्तिवादात पुराव्यांची साखळी, घटनाक्रमातील विसंगती तसेच आत्महत्येस थेट प्रवृत्त केल्याचे ठोस पुरावे नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करुन न्यायालयाने आरोपीविरुद्धचा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. त्यानुसार आरोपी संजय लक्ष्मण केवळे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
तसेच न्यायालयाने तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मोबाईल हँडसेट मालकी हक्क पडताळून मूळ मालकास परत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. महेश जगताप, ॲड. राहुल कसबे व ॲड. केदार पाटील यांनी युक्तिवाद केला. तर सरकार पक्षातर्फे ॲड. डी. डी. देशमुख यांनी काम पाहिले.
Post Views: 8