
सोलापूर – रेल्वेच्या ७९व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत रविवारी मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट ‘अ’ आणि बिजापूर क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या सामन्यांत शानदार विजय नोंदवले.
रेल्वे मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य रेल्वे संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १६३ धावांचा मजबूत धावफलक उभारला. यामध्ये अभिषेक पवार याने ३७, प्रवीण देशेट्टी याने २२, सिद्धार्थ नाका याने १९ तर पृथ्वीराज मिसाळ याने नाबाद १७ धावा केल्या. जयहिंद कुर्डूवाडीकडून प्रवीण मोहडी आणि अभी मुले यांनी प्रत्येकी २ बळी, तर विल्सन काळे आणि सचिन सुरवसे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
१६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जयहिंद कुर्डूवाडीचा डाव अवघ्या १६ षटकांत ५८ धावांवर आटोपला. रणवीर गवळी (११८ धावा) आणि रितेश कॉलने (१५ धावा) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. मध्य रेल्वेकडून आदित्य दडे, सिद्धार्थ नाका आणि पार्थ लोंढे यांनी प्रत्येकी २ बळी, तर वेदांत काळे याने १ बळी घेतला. उत्कृष्ट कामगिरी बद्दल सिद्धार्थ नाका याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. वरिष्ठ खेळाडू वासुदेव दोरणाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राजा पटेल, विक्रांत पवार, अंबादास तोरा उपस्थित होते. या सामन्यात सचिन गायकवाड व नवीन माने यांनी पंच म्हणून तर शुभम मुतुर यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले
दुपारच्या सत्रात बिजापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. साऊथ सोलापूर आपटे रेड संघाचा डाव १७ षटकांत अवघ्या ९९ धावांवर मर्यादित राहिला. चेतन माडेकर याने २३, श्रेयस दुधगी याने २१ तर नवीन आवर याने १३ धावा केल्या. बिजापूर क्लबच्या अक्षय भांबिरे याने घातक गोलंदाजी करत १५ धावांत ४ बळी घेतले. अक्षय बिरादार, डी. सुमित आणि गिरीश यादव यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल बिजापूर क्रिकेट क्लबने अवघ्या ९.१ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १०२ धावा करत विजय मिळवला. आदर्श राठोड याने ३१, शांतेश याने २४ आणि अक्षय भांबिरे याने २३ धावांचे योगदान दिले. साऊथ सोलापूरकडून श्रेयस दुधगी, स्वयंम टोणपे आणि सचिन माने यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. ४ बळी आणि २३ धावा करणाऱ्या अक्षय भांबिरे याला सामनावीर घोषित करण्यात आले. प्रवीण देशेट्टी, लियाकत शेख यांच्या हस्ते त्याला पुरस्कृत करण्यात आले. सामन्यात चिराग शहा व शुभम मुतुर यांनी पंच म्हणून तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.
उद्याचे सामने:
सकाळी : केपी क्रिकेट अकॅडमी विरुद्ध हैदराबाद कर्नाटका क्रिकेट क्लब.
दुपारी : टाइम्स ११ विरुद्ध साऊथ सोलापूर आपटे ब्ल्यू.






















