
सोलापूर – येथे सोमवारी सकाळी पद्मावती रामण्णा लाडर वय ८० यांचे आजारामुळे निधन झाले. त्यानंतर घरातच आजारी असणारे त्यांचे पती रामण्णा लाडर वय ८६ यांना पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच त्यांचीही पत्नीवियोगाने प्राणज्योत मालावली. त्यामुळे एकाच दिवशी व एकाच वेळी पती पत्नीचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लाडर कुटुंब मूळचे कर्नाटकामधील जिगजिणीचे रहिवाशी. त्या भागातच रामण्णा लाडर यांनी शिक्षकाची नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर नातेवाईक म्हणून मंद्रूपमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर लाड गुरूजी म्हणून ते भजन, किर्तन व पूजाअर्चा यामध्ये हिरीरीने भाग घ्यायचे. हनुमान मंदिरात भजन व किर्तन करायचे. तसेच दत्त मंदिराचे पुजारी म्हणूनही त्यांची मंद्रूपमध्ये परीचय होता. आठवड्यापूर्वी फरशीवरून पाय घसरून पडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. तर त्यांची पत्नी पद्मावती या वृध्दापकाळामुळे आजारी होत्या. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले होते. सोमवारी सकाळी पद्मावती यांचे आजारामुळे निधन झाले. त्यामुळे घरात पाहुणे व नातेवाईकांची वर्दळ पाहून लाड गुरूजीनी विचारणा केली. त्यावेळी पत्नीचे निधन झाल्याचे कळताच लाड गुरूजींचेही प्राणज्योत मालावली. सायंकाळी मंद्रुप येथील हिंदु स्म्शानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले . पुजारी व अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांच्या आवडीचे लाड गुरुजी व त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे मंद्रूप परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहीत मुलगा, दोन मुली , सुना व नातवंडे असा परिवार आहे.























