सोलापूर – स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही महाविकास आघाडीने, विशेषतः काँग्रेसने, उमेदवार देत निवडणुकीत रंगत निर्माण केली. संख्याबळ अपुरे असताना काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला सूचकही मिळणार नाहीत, अशी खिल्ली उडवली जात असतानाच काँग्रेसने अत्यंत गोपनीय आणि अचूक व्यूहरचना आखत दहा सूचकांच्या मदतीने उमेदवारी दाखल करून भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसच्यावतीने पंढपूरचे शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जासाठी आवश्यक सूचकांची जुळवाजुळव करण्यात काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता पाळली. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी बार्शीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्याशी संपर्कसाधून रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. या हालचालींमुळे राजकीय वातावरणात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे, एका रात्रीत काँग्रेसने आवश्यक सूचकांची जुळवाजुळव करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात यश मिळविले. भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात असताना काँग्रेसने दिलेल्या या राजकीय आव्हानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्मिता फत्तेपुरकर, ओंकार जोशी, उज्ज्वला लोखंडे, नागेश भोसले, चेतन नरोटे, नरसिंह आसादे, कृष्णराज बारबोले, आकाश राऊत, भागवत मांगडे आणि मेहदिमिया लांडगे यांनी सह्या केल्या आहेत.
काँग्रेसकडे विजयासाठी आवश्यक संख्या नसल्याचे स्पष्ट असतानाही निवडणूक लढविण्याचा निर्णय हा केवळ राजकीय उपस्थिती दाखविण्यासाठी नसून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकद दाखविण्याचा प्रयत्न मानला जात आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने केलेली ही अनपेक्षित चाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, पुढील काही दिवस या निवडणुकीभोवतीची राजकीय समीकरणे अधिक चर्चेत राहणार आहेत.
चौकट
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांची विधान परिषद निवडणुकीची सलग दुसर्यांदा संधी हुकली. यावेळी त्यांना उमेदवारी अपेक्षित होती. परंतु उमेदवारीपासून त्यांना वंचित राहावे लागले. याविषयी त्यांनी समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी केलेले काम, संघटनात्मक जबाबदार्या, जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि पक्षाच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा व गुणवत्तेच्या बळावर अपेक्षा ठेवणे स्वाभाविक होते. मात्र पक्षाने वेगळा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा माझ्या वाट्याला प्रतीक्षा आणि निराशाच आली. आज दुसर्यांदा संधी हुकली आहे. त्यामुळे मनात नाराजी आहे, वेदना आहे, अस्वस्थता आहे, असे प्रा. कुलकर्णी यांनी समाज माध्यमावरील प्रतिक्रियेत म्हटले आहे.