बार्शी – शहरातील सुभाषनगर परिसरातील एका पान शॉपवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित दुकान चालकाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाषनगर येथील हिरेमठ हॉस्पिटलजवळील ‘त्रिमूर्ती पान शॉप’ या दुकानावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान विविध ब्रँडचा गुटखा, पानमसाला, आरएमडीसह एकूण १५ प्रकारचे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले.
सदर कारवाईनंतर बार्शी शहर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी सुपूर्द केला. अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी यांनी पंचांसमक्ष मुद्देमालाची पाहणी केली असता जप्त करण्यात आलेल्या पाकिटांमध्ये गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी, कात, चुना आणि तत्सम घटकांचे मिश्रण असल्याचे निदर्शनास आले.
तपासणीदरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांचा एकूण १३ हजार ३८२ रुपयांचा साठा आढळून आला. महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचना दि. १६ जुलै २०२५ अन्वये राज्यात गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, वाहतूक, साठा व विक्रीवर बंदी असतानाही हा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
याप्रकरणी संकेत भगवान लांडगे (वय ३२, रा. सुभाषनगर, बार्शी) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमे तसेच भारतीय न्यायसंहितेच्या कलम २२३, २७४, २७५ व १२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच प्रतिबंधित पदार्थांची विक्री पुन्हा होऊ नये म्हणून संबंधित पान शॉप सील करण्यात आले आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या गुटखा व पानमसाल्याचा मूळ मालक कोण, त्याचा पुरवठादार कोण आहे, तसेच या अवैध साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यासाठी सविस्तर चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Post Views: 7