सोलापूर – सांगोला तालुक्यातील घेरडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन शिपाई पदांच्या नियुक्त्यांबाबत गंभीर अनियमिततेचा आरोप समोर आला असून संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मान्यता तत्काळ रद्द करून जबाबदारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी घेरडी येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे विश्वस्त यशवंत दगडू पुकळे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनात पोपट रामा गेजगे आणि इब्राहीम हजरत खलिफा यांच्या शिपाई पदावरील नियुक्त्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे मंजूर झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित नियुक्त्यांना संस्थेची किंवा शालेय समितीची कोणतीही वैध मंजुरी नसल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, ज्या कालावधीत पोपट गेजगे यांना शिपाई पदावर नियुक्त दाखविण्यात आले, त्याच कालावधीत ते नियमित विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होते. त्यांची शाळेतील उपस्थिती शंभर टक्के असल्याचा दावा करण्यात आला असून नियुक्तीच्या वेळी ते आवश्यक वयोमर्यादाही पूर्ण करत नव्हते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, नियुक्ती प्रस्तावात त्यांना दहावी उत्तीर्ण दाखविण्यात आले असताना ते प्रत्यक्षात त्या कालावधीत शिक्षण घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच इब्राहीम खलिफा यांच्याबाबतही नियुक्ती कालावधीत ते नियमितपणे कनिष्ठ महाविद्यालय व पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होते, अशी माहिती विविध शैक्षणिक संस्थांकडून मिळालेल्या नोंदींमधून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शिपाई पदावरील मान्यता अस्तित्वात असतानाच त्यांना नंतर सहशिक्षक पदासाठीही मान्यता देण्यात आल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव तथा मुख्याध्यापक आणि लिपिक यांनी संगनमताने शिक्षण विभागाकडे चुकीची माहिती सादर करून शासनाची दिशाभूल केली व आर्थिक नुकसान घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांवर निलंबनाची कारवाई करून शासनाचे झालेले आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनामुळे सांगोला तालुक्यातील शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली असून शिक्षण विभाग या गंभीर आरोपांची दखल घेऊन चौकशी सुरू करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
कोट
१८ मे २००९ रोजी याच विषयावर सविस्तर तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पुन्हा एकदा निवेदन करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी आमची मागणी आहे. तसे निवेदन सीईओ कुशल जैन आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.
– यशवंत पुकळे, विश्वस्त मॉडर्न एज्युकेशन सोसायटी घेरडी, तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
Post Views: 12