
माढा : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एफडीए चा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ औषध व गुटखा साठ्यावर धाड टाकून संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. त्यांनी राज्यभर करत असलेल्या कारवाईचे कौतुक म्हणून माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला आहे. खास करून भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांवर मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर धडक कारवाई करत अनेकांवर कारवाई केली आहे. त्या गोष्टीचे आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांनी आयएएस अधिकारी मुंढें यांचे कौतुक केले आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी असाही सवाल केला आहे की जर एक अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे हे ज्या विभागात बदली केली जाईल त्या विभागातील प्रत्येकाला न्याय देण्यासाठी योग्य पद्धतीने कारवाई करत असतील तर इतर अधिकाऱ्यांना हे का जमत नाही. तसेच शासन धडाकेबाज कार्यशैली असणाऱ्या तुकाराम मुंढेंवर बदलीची कारवाई वेळोवेळी का करते. मुंढें यांच्या २१ वर्षाच्या सेवेत त्यांची जवळपास २४ वेळा बदली झालेली आहे. राज्यकर्त्यांना असे अधिकारी चालत नाही का ? हा सवालही त्यांनी यावेळेस केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मुंढें यांना अशा गोष्टींवर तुम्ही बेधडकपणे कारवाई करा आम्ही तुमच्यासोबत असल्याची घोषणाही दिल्या.
यावेळेस शंभू साठे ,आबा साठे ,पिंटू काशीद, सचिन करळे, बालाजी खेडकर, जितू जमदाडे,संदीप साठे, गौतम शिंदे, सचिन वाघ, सुधीर वारगड ,सत्तार मुलाणी ,सतीश जमदाडे, काका पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
चौकट…
शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तुकाराम मुंढे यांना साखर आयुक्त करा..
महाराष्ट्र राज्याचे धडाकेबाज आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पद आल्यापासून राज्यभर भेसळयुक्त औषध खाद्यपदार्थ तसेच दुग्धजन्य पदार्थांवर बेधडक कारवाई करण्यात येत आहे ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असून शासनाने मुंढे साहेबांना राज्याच्या साखर आयुक्त पदावर बदली करून ऊस शेतकऱ्यांची होत असणारी लूट थांबवावी.
शंभू साठे
सामाजिक कार्यकर्ते माढा
Post Views: 8