सोलापूर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखा मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे लाडके नाट्य व सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच नाट्य परिषद सोलापूर शाखेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे सोलापूरमधील रंगकर्मी आणि नाट्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
*सोलापूर शाखेच्या कार्याचा घेतला आढावा*
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान प्रशांत दामले यांनी सोलापूर शाखेच्या आजवरच्या वाटचालीचा, राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि कामांचा सविस्तर आढावा घेतला. सोलापूर शाखेने मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी केलेले प्रयत्न आणि स्थानिक नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी घेतलेले परिश्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे दामले यांनी नमूद केले. सोलापूर शाखेच्या या सातत्यपूर्ण कार्याबद्दल त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले व पाठीवर कौतुकाची थाप दिली.
*प्रशांत दामले यांचा भावपूर्ण सत्कार*
नाट्य परिषदेच्या सोलापूर कार्यालयात प्रशांत दामले यांचे आगमन होताच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अत्यंत भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या विशेष आणि कौटुंबिक सोहळ्याला नाट्यसृष्टीतील आणि परिषदेतील अनेक दिग्गज पदाधिकारी, ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष आणि मध्यवर्तीचे कार्यकारणी सदस्य विजय साळुंखे नाट्य परिषद सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची,
प्रमुख कार्यवाहक प्रा.ज्योतिबा काटे, सहकार्यवाह आणि नियमक मंडळाचे सदस्य सुमित फुलमामडी, कोषाध्यक्ष विद्या काळे, यांच्यासह कार्यकारणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, व्यंकटेश रंगम, प्रशांत देशपांडे, शांता येळंबकर, राजाराजेशचंद्र, दत्तात्रय बडगंची, प्रशांत बडवे आणि मारुती कटकधोंड यांनी उपस्थिती लावली होती. तसेच उपनगरीय शाखेचे आशुतोष नाटकर, शिवाजी उपरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर आणि रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीमुळे आगामी काळात सोलापूरमधील नाट्य चळवळीला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Post Views: 7