वेळापूर – आषाढी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर अशा ३१५ किलोमीटरच्या पावन प्रवासासाठी अंकली येथून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे दिनांक २७ जून रोजी शितोळे-सरकार राजवाड्यावरून पारंपरिक थाटात प्रस्थान होणार आहे. या वारी सोहळ्याचे सर्व नियोजन व पूर्वतयारी पूर्णत्वास आली असल्याची अधिकृत माहिती श्रीमंत महादजीराजे शितोळे-सरकार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
अंकली ते आळंदी दरम्यानचा सुमारे ३१५ कि.मी. चा हा प्रवास अश्वांसह स्वार व त्यांचे पूर्ण पथक पायी कापणार आहे. रोज साधारण ३० कि.मी.चा टप्पा पार करून सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला जाईल.
वारीच्या काळात दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी माऊलींची आरती झाल्यानंतर त्यांना पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. हा मान पिढ्यानपिढ्या शितोळे सरकारांकडेच आहे. या महानैवेद्याच्या साहित्याचा ट्रॅक्टरही अश्वांच्या प्रस्थानाच्या दिवशीच (२७ जूनला) अंकलीहून रवाना होणार आहे.
अश्वांचे आळंदीत आगमन झाल्यानंतर दिंडीचे मालक बाळासाहेब आरफळकर-पवार व ज्ञानेश्वर माऊली देवस्थानच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल. यावेळी मानाचे अश्व थेट मुख्य गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतील, अशी परंपरा आजही कायम राखण्यात आली आहे.
आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर माऊलींचा परतीचा प्रवास सुरू होईल. पंढरपूरच्या वेशीपर्यंत माऊलींच्या अश्वांना निरोप दिला जाईल. त्यानंतर हे अश्व आणि पथक पुन्हा अंकलीकडे मार्गस्थ होतील, अशी माहिती श्रीमंत महादजीराजे शितोळे-सरकार यांनी दिली आहे.
– असा आहे संपूर्ण प्रवास !
– २७ जून: गावच्या वेशीकडे प्रस्थान झाल्यानंतर दुपारी १२ वाजता अंकलीतून मुख्य प्रवासाला सुरुवात होईल. पहिला मुक्काम मिरज येथे असेल.
२८ जून: सांगलवाडी
२९ जून: ईश्वरपूर पेठनाका
३० जून: वहागाव
१ जुलै: भरतगाव
२ जुलै: भुईंज
३ जुलै: सारोळा
४ जुलै: शिंदेवाडी
५ व ६ जुलै: पुणे
७ जुलै: आळंदी (येथे माऊलींच्या अश्वांचा मुक्काम असेल)
Post Views: 28