मंठा – मंठा शहरात नागरिकांच्या जीवाशी खेळणारी धक्कादायक घटना पडली. प्रशासन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नसून या घटनेवर कुठलीच कार्यवाही अन्न व औषध प्रशासनाने केली नसल्याने नागरिकाकडून संताप व्यक्त केला जात असून शहरातील अस्थपणा, हॉटेल तसेच खानावळ धारक यांनी दलालामार्फत मलिदा पोहोचवण्याची चर्चा रंगत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणारी घटना एवढे होऊनही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील मा नवदुर्गा बिकानेर स्वीट मार्ट येथून खरेदी केलेला पॅकबंद फराळी चिवडा खाल्ल्यानंतर एका तरुणास विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित दुकानावर कारवाईची मागणी होत आहे. मंठा शहरात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थाची सर्रास विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथील अजय कानबा काळे (वय 23) या युवकाने संबंधित दुकानातून फराळी चिवड्याचे पाकीट खरेदी केले होते. हा चिवडा खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केल्यामुळे या युवकाचा जीव वाचला.
दरम्यान, संबंधित चिवड्याच्या पाकिटावरील कालबाह्यता तारीख संपलेली असल्याचे समोर आले आहे. एक्सपायरी डेट संपल्यानंतरही हा माल विक्रीस ठेवल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ संबंधित दुकानाची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच शहरातील इतर दुकाने व हॉटेलांमध्येही कालबाह्य अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. हॉटेल चालक सर्रास भेसळयुक्त खवा, बासुंदी, भेसळीच्या तेलातील पदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री करीत आहेत.
ग्रामीण भागातून येणारे अनेक ग्राहक घाईगडबडीत किंवा माहितीअभावी उत्पादनावरील उत्पादन तारीख व कालबाह्यता तारीख तपासत नाहीत. याचाच फायदा घेत काही दुकानदार व स्वीट मार्ट चालक कालबाह्य झालेला माल विक्री करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जालना येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
















