माढा : माढा शहरातील कसबा पेठ विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे ३.३० वाजता नगराध्यक्षा अॅड मिनल साठे, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे , माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुराज कानडे भाग्यश्री कानडे व पांडुरंग पाटील रसिका पाटील या दांपत्याच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. या प्रसंगी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे नगरसेविका अर्चना कानडे पुजारी बापू कुंभेजकर आधी भाविक भक्त उपस्थित होते.
महापूजा नंतर भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरावर शेकडो वर्षापासून शिखर नव्हते परंतु यावर्षी लोकवर्गणीतून शिखराचे काम पूर्ण झाल्याने व मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने भाविकांमध्ये मोठे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले. पहाटेपासूनच माढा शहरासह परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी १०.३० वाजता शहरातून ग्रंथदिंडीचे नगरप्रदक्षिणा काढण्यात आली यामध्ये विठ्ठलाचा जयघोष करत भजन टाळ मृदंगाच्या वाद्यात ज्ञानबा तुकारामांच्या जयघोष करत भजनी मंडळ,शाळकरी मुले महिला अबाल वृद्ध यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण केले. या दिंडीचे सारथ्य माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी केले. दिंडी शहराच्या मुख्य मार्गावरून जात असताना टाळ मृदंग ज्ञानबा तुकाराम या जयघोषाने माढानगरी दुमदुमून निघाले होती. दादासाहेब साठे यांच्या वतीने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
पहाटेपासूनच माढा शहरासह ग्रामीण भागातून टाळ मृदुंग व भगव्या पताका घेऊन हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी येत होती. भाविकांची मोठी गर्दी असुनही दर्शन रांगेची उत्तम सोय उत्सव समितीकडून करण्यात आली असल्याने व्यवस्थितपणे भाविक भक्तांना विठ्ठलाचे दर्शनाचा लाभ घेता आला. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी माढा नगरपंचायत,जगदंबा गणेश मंडळ कसबा पेठ, क्रीडा तपस्वी श्रीरंग पालकर सर सन्मती पतसंस्था, बीबीएस ग्रुप, शिवशाही प्रतिष्ठान व इतर सामाजिक संस्थांकडून फराळाचे वाटप करण्यात आले होते. हा उत्सव पार पाडण्यासाठी विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, मंदिर उत्सव समिती, जगदंबा गणेश मंडळ कसबा पेठ, पुजारी बापू कुंभेजकर व विठ्ठल भक्तांनी परिश्रम घेतले.
Post Views: 19