सोलापूर : प्रभाग क्रमांक २१ मधील स्वागत नगर भाग-१ येथे अनेक वर्षांपासून रात्री उशिरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करत अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने महापौर विनायक कुंडल यांना निवेदन देण्यात आले. पाणीपुरवठ्याची वेळ बदलून नागरिकांना सोयीस्कर वेळेत पाणी देण्याची तसेच लहान पाईपलाईनऐवजी मोठ्या क्षमतेच्या पाईपलाईन टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, स्वागत नगर परिसरात बहुतांश नागरिक हे एमआयडीसीतील यंत्रमाग उद्योग तसेच बिडी व्यवसायाशी संबंधित कामगार वर्गातील आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्टाची कामे करूनही या भागात रात्री १० नंतर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना रात्री उशिरापर्यंत पाणी भरण्यासाठी जागरण करावे लागते. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५ ते ६ किंवा पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास निश्चित करण्यात यावी, तसेच परिसरातील जुन्या व अरुंद पाईपलाईन बदलून मोठ्या पाईपलाईन बसवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे कमी वेळेत आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अभिनव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष मिनल दास, जिल्हा उपाध्यक्ष सरोजिनी माकाई, जिल्हा कार्याध्यक्ष सोनाली सगर, जिल्हा संघटक अनिता वाघमारे, जिल्हा सचिव संजीवनी सलबत्ते, शहराध्यक्ष जयश्री रानसरजे, अरुणा दिवानजी, शहाजन सातखेड, अनिसा पटेल, सुरेखा चव्हाण, रमेजा शेख, निर्मला जगले, प्राजक्ता कुलकर्णी, भारती गुंनाल, श्वेता कुलकर्णी, शुभांगी कुलकर्णी, आशाबी नीलगुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Post Views: 15