सोलापूर : सोलापूरच्या विविध प्रलंबित विकास प्रश्नांसाठी १२ जून रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जाहीर करण्यात आलेले सोलापूर विकास मंचाचे आंदोलन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. विकास प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला काही कालावधी देण्याचा निर्णय मंचाने घेतला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत प्रदीर्घ बैठक झाली. यावेळी सोलापूरच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या विकासासाठी प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विषयांवर शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली.
बैठकीत सोलापूर विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू करणे, नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करणे, आयटी पार्क उभारणी, परिवहन बस सेवा, शहराचा पाणीपुरवठा प्रश्न, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच अन्य विकासकामांबाबत केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी दिले.
याशिवाय काही महत्त्वाच्या विषयांवर सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री यांची बैठक आयोजित करण्याबाबतही सकारात्मक भूमिका असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती मंचाच्या वतीने देण्यात आली.या प्रश्नांवर कार्यवाही करण्यासाठी शासन व प्रशासनाला काही कालावधी द्यावा आणि तोपर्यंत आंदोलन स्थगित करावे, अशी सूचना पालकमंत्री गोरे यांनी केल्याचे मंचाने सांगितले. त्यांचा मान राखत तसेच सोलापूरच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने नियोजित आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंचाने स्पष्ट केले.
या बैठकीस सोलापूर विकास मंचाचे सदस्य मिलिंद भोसले, केतन शहा, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, मनोज क्षीरसागर, अॅड. दत्तात्रय अंबुरे, प्रा. प्रसन्न नाझरे, सुहास भोसले, आनंद पाटील आदी उपस्थित होते.
Post Views: 24