सोलापूर – करमाळा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील उपअभियंता पद रिक्त राहिल्यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. संबंधित अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती आधीपासून असतानाही पर्यायी नियुक्ती वेळेत करण्यात न आल्याने अनेक प्रशासकीय प्रस्ताव आणि विकासकामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, विद्यमान बांधकाम उपअभियंता यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दहा दिवस आधी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला होता. मात्र, सेवानिवृत्तीला तब्बल अकरा दिवस उलटूनही नव्या उपअभियंत्याची नियुक्ती झालेली नाही.
या रिक्त पदाचा परिणाम पंचायत समितीच्या विविध विकासकामांवर होत असल्याची चर्चा आहे. तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रके, मोजमापे तसेच विविध बांधकाम प्रस्तावांच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने ग्रामपंचायतींसह ठेकेदार आणि लाभार्थ्यांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पक्षनेत्या रश्मी बागल यांनी या पदावर तातडीने नियुक्ती करण्याबाबत प्रशासनाला लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
दरम्यान, पंचायत समिती प्रशासन आणि गटविकास अधिकाऱ्यांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. विकासकामांची गती कायम ठेवण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असताना करमाळा पंचायत समितीतील हे महत्त्वाचे पद रिक्त राहिल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील प्रलंबित कामे आणि रखडलेले प्रस्ताव यांचा विचार करता, नवीन उपअभियंत्याची नियुक्ती कधी होणार याकडे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
कोट
तो आमचा निर्णय
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना याबाबत विचारले असता या प्रकरणात काय निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल. हा प्रशासनिक प्रश्न आहे. असे सांगून मुद्दा मिटविला.
Post Views: 15