सोलापूर – जिल्हा परिषद कर्मचार्यांना वेतन खात्यांतर्गत मिळणार्या विविध लाभांसंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत जिल्हा परिषद कर्मचार्यांना एक कोटी रुपयाच्या विमा संरक्षणासह विविध लाभ मिळणार आहेत.
शुक्रवारी, जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन होते. प्रारंभी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी प्रास्ताविक करून सॅलरी पॅकेज योजनेचे महत्त्व विशद केले.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक आनंदकुमार पाटकर यांनी एसजीएसपी/एमओयू सॅलरी पॅकेजबाबत सविस्तर माहिती देताना कर्मचार्यांच्या हिताच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.
या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू लाभ, कायमस्वरूपी अपंगत्व लाभ, अंशतः अपंगत्व लाभ, वैद्यकीय खर्चासाठी विमा संरक्षण, वैयक्तिक विमा तसेच विविध बँकिंग सुविधा उपलब्ध होतात. या योजनेत पात्र कर्मचार्यांना एक कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षणाचा लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जैन म्हणाले, प्रत्येक कर्मचार्याने आपले एसबीआय वेतन खाते या योजनेत समाविष्ट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. खाते या योजनेत समाविष्ट नसल्यास संबंधित एसबीआय शाखेशी संपर्क साधून ते तातडीने सॅलरी पॅकेजमध्ये रूपांतरित करून घ्यावे. तसेच खात्यामध्ये नामनिर्देशन अद्ययावत असल्याची खात्री करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
प्राथमिक टप्प्यात एसबीआय खातेदार कर्मचार्यांसाठी या सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, त्यानंतर इतर बँकांच्या खातेदार कर्मचार्यांसाठीही अशाच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जैन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक लेखाधिकारी उमाकांत राजगुरू यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या वेतन खात्यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी वित्त व लेखाधिकारी मिनाक्षी वाकडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक आनंदकुमार पाटकर आदींची उपस्थिती होती.
Post Views: 8